रोहित टिळकांकडून अनेकींचे लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ!

0

बलात्कार पीडितेचा आरोप, विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू आणि काँग्रेसचे युवानेते रोहित टिळक यांच्यावर 41 वर्षीय बलात्कार पीडितेने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मुलींचे लैंगिक शोषण करता यावे म्हणून टिळक यांनी कोरेगावपार्क येथे स्वतंत्र सदनिकाच विकत घेतली होती. तिथे अनेकींचे लैंगिक शोषण करण्यात आले असून, त्याचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहेत. तसेच, त्या महिला व मुलींची आक्षेपार्ह अवस्थेत छायाचित्रेही काढण्यात आलेली आहेत. याप्रकरणी तातडीने तक्रार नोंदवून तपास करण्यात यावा, तसेच आपलेही अश्लील व्हिडिओ टिळक यांच्याकडे असण्याची शक्यता पाहाता, त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बलात्कार पीडितेने पोलिस आयुक्तांसह सायबर सेलकडे लेखी तक्रार दाखल करून केली आहे. याबाबतची रितसर तक्रारही त्यांनी विश्रामबाग पोलिसांत दाखल केली आहे.

मॉडेलसह दोन तरुणींच्या नावांचा उल्लेख
उच्च न्यायालयात वकील असलेल्या 41 वर्षीय पीडितेने 38 वर्षीय रोहित टिळक यांच्यावर यापूर्वीच लग्नाच्या आमिषाने वारंवार लैंगिक शोषण, अनैसर्गिक संभोग व मारहाणीची तक्रार दाखल केलेली आहे. तसेच, टिळक यांना मिळालेल्या नियमित जामिनाविरुद्ध त्यांनी न्यायालयात धावदेखील घेतलेली असून, सद्या ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. रोहित टिळक यांनी आपल्यासह अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत, त्यांच्याकडे आपल्यासह इतरही तरुणींची अश्लील छायाचित्रे व व्हिडिओ असावेत, असा संशय व्यक्त करून टिळक यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी या पीडितेेने गतमंगळवारी पोलिस आयुक्त पुणे, डीसीपी सायबर सेल पुणे, विश्रामबाग पोलिस ठाणेसह महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारअर्जात या पीडितेने केले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यात त्या नमूद करतात, की टिळक यांनी कोरेगावपार्क येथे मुली व महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी स्वतंत्र सदनिकाच घेतलेली आहे. तसेच, महिलांसोबत ठेवलेल्या शरीरसंबंधाचे व्हिडिओ चित्रिकरण करून व त्याचा वापर करून गैरप्रकारही होत असल्याचा संशय पीडितेने व्यक्त केलेला आहे. या अर्जात दोन तरुणींची नावेही या पीडितेने नमूद केलेली असून, त्यांचे अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे रोहित टिळक यांच्या स्मार्टफोनमध्ये पाहण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच, एका मॉडेल अभिनेत्रीचे अश्लील छायाचित्रही आपण टिळक यांच्या फोनमध्ये पाहिल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दोन तरुणींचे अश्लील व्हिडिओ तर त्यांची पत्नी प्रणिती टिळक यांनाही पाठविण्यात आल्याचेही या पीडितेने नमूद केलेले आहे.

412 पानांचे पुरावे, फोटो, व्हिडिओज दाखल
रोहित टिळक यांच्याकडे अनेक महिला व तरुणींचे अश्लील व्हिडिओ असून, त्यात आपल्यासोबत झालेल्या बलात्काराचे व लैंगिक शोषणाचेही व्हिडिओ असू शकतात. तसेच, हे व्हिडिओ व छायाचित्रे सार्वजनिक होण्याचाही धोका आहे. तेव्हा टिळक यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करून त्यांच्या ताब्यातील अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे हस्तगत करावी तसेच कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही पीडितेने या तक्रारअर्जाद्वारे केलेली आहे. पीडितेने रोहित टिळक यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिसांत भारतीय दंडविधानाच्या कलम 376, 377 आणि 348/17 कलमान्वये दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी सर्व प्रकारचे पुरावेही पोलिसांत दाखल केलेले आहेत. त्यात व्हिडिओ आणि छायाचित्रांचाही समावेश आहे. जवळपास 412 पानांचे पुरावे पीडितेने पोलिसांत सादर केलेले असून, त्यामुळे टिळक यांच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत. या गुन्ह्यात टिळक सद्या नियमित जामिनावर आहे. तर हा जामीन रद्द करण्यासाठी पीडितेने उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे.