पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू व काँग्रेसचे युवानेते रोहित टिळक बलात्कार व अनैसर्गिक संभोग, मारहाणप्रकरणी 41 वर्षीय पीडितेने अखेर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. टिळक यांचा नियमित जामीन रद्द करण्यात यावा; तसेच त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी पीडितेने उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तानाजी नलावडे यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गुरुवारी न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून, म्हणणे मांडण्यासाठी टिळक यांना नोटीस जारी केली आहे. सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे पीडितेचे वकील तौसिफ शेख यांनी सांगितले. ते स्वतः या प्रकरणात पीडितेची बाजू मांडणार आहेत.
रोहित टिळक सद्या नियमित जामिनावर!
पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश लता येणकर यांच्या कोर्टाने याप्रकरणी रोहित टिळक यांना नियमित जामीन मंजूर केलेला आहे. या जामिनाला विरोध करणारा पीडितेचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्याविरोधात आपणास न्याय मिळाला नाही, येणकर कोर्ट टिळक यांच्याबाबतीत सकारात्मक होते, अशी भूमिका घेत पीडितेने उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार, अखेर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पीडिता या स्वतः उच्च न्यायालयातील वकील आहेत. टिळक यांनी लग्नाच्या आमिषाने वारंवार बलात्कार, अनैसर्गिक संभोग आणि मारहाण करण्याचा आरोप पीडितेने केला असून, त्याबाबत 17 जुलैरोजी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल झालेली आहे. तक्रार दाखल होताच टिळक यांनी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळविला होता. त्याविरोधात पीडितेने अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाकडे जामीन रद्द करण्यासाठी विनंतीअर्ज केला होता. तसेच, आपली व आरोपीची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणीही केली होती. परंतु, अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी हा अर्ज फेटाळून लावला होता.
रोहित टिळकांच्या अडचणी वाढल्या
पीडिता या पतीपासून वेगळ्या राहात असून, दोन वर्षापूर्वी त्या रोहित टिळक यांच्या संपर्कात आल्या होत्या. प्रारंभी दोघांत मैत्री झाली. त्यानंतर टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच, गर्भपातासाठी दबावही आणला असे या पीडितेने पोलिसांना दिलेल्या बयाणात नमूद आहे. पोलिस सद्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. तांत्रिक व वस्तूनिष्ठ पुरावेही त्यांनी पोलिसांना सुपूर्त केलेले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी टिळक यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलेला असून, तपासास सहकार्य कऱणे व पुराव्यांशी छेडछाड न करण्याची अट घातलेली आहे. सत्र न्यायाधीशांच्या निकालाविरोधात पीडिता उच्च न्यायालयात गेल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले असून, रोहित टिळक यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयाने म्हणणे मांडण्यासाठी रोहित टिळक यांना नोटीस जारी केली असून, सोमवारी याप्रकरणी सुनावणी होणार असल्याची माहिती अॅड. तौसिफ शेख यांनी दिली.