रोहित टिळकांच्या अडचणी वाढल्या!

0

पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू व काँग्रेसचे युवानेते रोहित टिळक यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालेली आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणाचा तपास पोलिसांनी गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. तसेच, तक्रार मागे घेतली नाही तर अ‍ॅसिड हल्ला करू, अशी धमकी मिळाल्याची तक्रार केल्यावरून, 41 वर्षीय पीडित वकिल महिलेने न्यायालयाकडे धाव घेत, पोलिस संरक्षणाची मागणी केली. न्यायालयाने या पीडितेला पोलिस संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. पीडित महिलेने काल जिल्हा व सत्र न्यायालयापुढे तीन अर्ज दाखल केले. त्यात आपली व आरोपीची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द करावा आणि आपल्या जीवितास धोका असल्याने संरक्षण पुरवावे, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागण्यांवर न्यायालय आता सोमवारी पुढील सुनावणी घेणार आहे.

दोघांच्याही वैद्यकीय तपासणीची मागणी
रोहित टिळक (वय 37) यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 376 (बलात्कार), 377 (अनैसर्गिक संभोग), 323 (मारहाण) आणि 506 अन्वये विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर टिळक यांना 21 जुलैरोजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. याप्रकरणी पीडित वकिल महिलेने काल सत्र न्यायालयात धाव घेऊन तीन अर्ज दाखल केले. त्यात टिळक यांचा अटकपूर्व जामीन तातडीने रद्द करण्याची मागणी केली व दोघांचीही विनाविलंब वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी केली. न्यायालयाने पुराव्याशी छेडछाड न करण्याच्या अटीखाली अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. परंतु, आरोपींकडून आपणास अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी मिळालेली आहे. तसेच, तक्रार मागे घेण्यासाठीही धमकावले जात आहे. त्यामुळे आरोपीचा जामीन फेटाळावा व आपणास संरक्षण द्यावे. टिळक यांनी सदर महिलेला दारुचे व सिगारेटचे व्यसन असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आपली बदनामी झाल्याचा आरोपही या पीडितेने केला. तसेच, आपली व टिळक यांच्या वैद्यकीय तपासणीची मागणी केली. अ‍ॅड. तोहसिफ शेख व बी. ए. अलूर यांनी पीडितेतर्फे न्यायालयापुढे हे अर्ज सादर केले होते. न्यायालयाने पीडितेला पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिल्याची माहितीही अ‍ॅड. शेख यांनी दिली.

पुरावे न्यायालयापुढे सादर
टिळकांच्या अटकपूर्व जामिनास विरोध करताना पीडितेने व्हॉईस रेकॉर्डिंग पुरावे, काही व्हिडिओ, ई-मेल आणि व्हॉटसअ‍ॅप मेसेजही न्यायालयापुढे सादर केले. तिच्या खासगी बेडरुममध्ये टिळकांसोबत काढलेले काही छायाचित्रेही तिने न्यायालयापुढे सादर केली. याबाबत पीडितेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, की आरोपीने आपणास सांगितले होते, की आपण राहुल गांधी यांचे डावे हात आहोत. त्यामुळे या प्रकरणातून आपण सहीसलामत सुटू. तसेच, टिळक यांनी आपणाकडून 56 लाख रुपये घेतल्याचा आरोपही या महिलेने केला. त्याबाबतचे बँक स्टेटमेंटही आपण कोर्टात सादर केल्याचे ही महिला म्हणाली. माझे खासगी एटीएमकार्ड ही टिळक यांनी खासगी खरेदीसाठी वापरल्याचे ही पीडिता म्हणाली. दरम्यान, पीडितेच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.