रोहित टिळक यांना जामीन मंजूर

0

पुणे । रोहित टिळक यांना बलात्कार प्रकरणात आंतरिम अटक पूर्व जामीन मंजूर झाला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 जुलै रोजी होणार आहे. तसेच पोलिस बोलावतील तेव्हा हजर राहून सहकार्य करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय युवक काँग्रेसचे समन्वयक रोहित टिळक यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एका वकील महिलेने फिर्याद दिली होती. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे या महिलेने म्हटले होते.

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न
याप्रकरणी रोहित टिळक यांनी अटक पूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी ब्लॅकमेल करण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले असून आमच्याकडे पुरावे आहेत, असा युक्तिवाद रोहित टिळक यांच्या वकिलांनी केला. यावर रोहित टिळक यांचा अटक पूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला.

पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
पीडित महिला मुंबई उच्च न्यायालयात वकिली करते. टिळक यांनी लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केला आणि गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. लग्नाची मागणी केल्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण केली. आर्थिक फसवणूकही केली, असे तक्रारीत म्हटले आहे. रोहित यांच्या जाचामुळे सदर महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच रोहित यांच्या कुटुंबीयांकडूनही संबंधित महिलेला त्रास देण्यात आला, असे तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.