रोहित ललित बाबू झाला राष्ट्रीय विजेता

0

पाटणा । देशातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंचा समावेश असलेल्या आणि सुमारे 13 दिवस रंगलेल्या 55 व्या खादी इंडिया राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाचा ग्रँडमास्टर रोहित ललित बाबुने बाजी मारली. रोहितचे कारकिर्दीतले वरिष्ठ गटाचे पहिलेच विजेतेपद आहे. एकीकडे रोहितच्या सहकारी बुद्धिबळपटू 2700 गुणांचा दरवाजा ठोठावत असताना, तो मात्र 2525 गुणांवरच अडकून पडला होता. त्यामुळे हे अजिंक्यपद भविष्यातील कामगिरी उंचावण्यासाठी फायदेशीर ठरेल असे बोलले जात आहे. रविवारी साडेआठ गुणांनी सुरुवात करणार्‍या रोहित बाबुने स्वप्निल धोपाडेविरुद्धचा सामना अनिर्णित राखत एकुण नऊ गुणांसह विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात कॅटलॉन आोपनिंगने डावाची सुरुवात करत ललितने अत्यंत सावध खेळ करत 14 चालींनंतर बरोबरी मान्य केली. अन्य लढतीत त्याच्यासोबत संयुक्तरित्या साडेआठ गुणांवर असणार्‍या अरविंद चिदंबरमला विजेतेपद मिळवण्यासाठी विजयाची आवश्यकता होती. पण देवाशिष दासकडून पराभूत झाल्यामुळे अरविंदला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले.

काळ्या सोंगट्यांनी खेळणार्‍या अरविंदने रविवारी किंग्ज इंडियन्स ओपनिंगने डावाची सुरुवात केली. पण त्याला सूर सापडला नव्हता, त्या दडपणाखाली अरविंदने देवाशिषला सोपा विजय बहाल केला. अन्य लढतींमध्ये मागील दोन वर्ष ही स्पर्धा जिंकणार्‍या मुरली कार्तिकेयनला यावेळी तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत साडे सात गुणांची नोंद करणार्‍या मुरलीने शेवटच्या दिवशी आर आर लक्श्मणविरुद्धचा सामना अनिर्णित राखला. याशिवाय एस नितीनला हरवणारा सुनील नारायणन आणि देवाशिष दास संयुक्तरित्या साडे सात गुणांवर होते. टायब्रेकमध्ये हे दोघे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिले. नितीन आणि अर्ध्यदीप दास टायब्रेकच्या आधारावर सहाव्या आणि सातव्या स्थानावर राहिले. शेवटच्या दिवशी अभिजीत कुंटेने अर्ध्यदीप दासचा पराभव केला.