रोहित शर्माकडे नेतृत्व

0

मुंबई । बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी, तसेच एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. कर्णधार विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी रोहित शर्माकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विराट श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार आहे. बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, विद्यमान कर्णधार विराट कोहलीला एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

एकदिवसीय मालिकेत मुबईचा फलंदाज श्रेयस अय्यर आणि पंजाबचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल हा भारतीय संघातील नवीन चेहरा असणार आहे. मनीष पांडे, केदार जाधव आणि दिनेश कार्तिकने संघातील स्थान कायम राखले आहे. स्थानिक सामन्यांमधील चांगल्या कामगिरीमुळे सिद्धार्थची निवड करण्यात आली आहे. यावर्षी सिद्धार्थ आयपीएलमध्ये सनरायजर्स हेदराबाद संघातून खेळला होता. यंदाच्या आयपीएलच्या हंगामात सिद्धाथने 10 सामन्यांमध्ये 16 विकेट्स मिळवल्या होत्या. श्रेयस अय्यरलाही पहिल्यांदाच एकदिवसीय संघात निवडण्यात आले आहे. याआधी तो भारतासाठी टी 20 सामने खेळला आहे.कसोटी मालिकेतील शेवटचा सामना दिल्लीतील फिरोझशहा कोटला मैदानात 2 ते 6 डिसेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे 10 डिसेंबर रोजी होईल. मालिकेतील दुसर्‍या सामन्यात उभय संघ 13 डिसेंबरला मोहालीत समोरासमोर उभे ठाकतील. विशाखापट्टणम तेथे 17 डिसेंबर रोजी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला जाईल. तीन सामन्यांच्या टी 20 क्रिकेट मालिकेला 20 डिसेंबरपासून कटक येथे सुरुवात होईल. दुसरा सामना 22 डिसेंबर रोजी इंदूर येथे खेळला जाईल. तिसर्‍या सामन्याचे यजमानपद मुंबईला मिळाले आहे. हा सामना 24 डिसेंबरला होईल.