नवी दिल्ली: क्रीडा क्षेत्रात मानाचा समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नावाची घोषणा आज शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केली. यात भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरा अॅथलेटिक्स मरिअप्पन थंगवेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट आणि हॉकीपटू राणी यांचा समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाच्या इतिहासात एकाचवेळी पाच खेळाडूंना खेलरत्नने गौरविण्याची ही पहिली वेळ असेल. यापूर्वी २०१६ मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, जिम्नॅस्ट दीपा करमाकर, नेमबाज जितू राय आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांना एकाचवेळी खेलरत्नने गौरविण्यात आले होते.
रोहित शर्माची खेलरत्नसाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरणार आहे. मागील वर्षी केलेल्या कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार मिळाला होता.
खेलरत्नसाठी शिफारस झालेली राणी पहिली महिला हॉकीपटू आहे. या आधी पुरुष हॉकीपटूंमध्ये धनराज पिल्ले (२०००) व सरदारसिंग (२०१७) यांना हा गौरव प्राप्त झाला होता. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ ला कालावधीत राणीने भारतीय संघाचे नेतृत्व करताना २०१७ ला महिला आशिया चषक जिंकून दिला. २०१८ च्या आशिया चषकात संघाने रौप्य पदक जिंकले तसेच २०१९च्या एफआयएच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निर्णायक गोल करीत तिने संघाला टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठून दिली होती. विनेशने २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धा तसेच आशियाई स्पर्धेत सुवर्ण व २०१९ च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपचे कांस्य पदक जिंकले होते.
टेबल टेनिसपटू मनिका बत्राने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीत सुवर्ण व आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. थंगवेलूने रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीचे सुवर्ण पदक जिंकले. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मासह २7 खेळाडूंची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली. दत्तू भोकनळ (रोइंग) राहुल आवारे (कुस्ती) मधुरिका पाटकर (टेबल टेनिस) आणि दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव या महाराष्ट्राच्या खेळाडूंचीही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे.