मुंबई । भारतीय क्रिकेटपटूंना कोणत्याही दौर्यासाठी जाताना यो-यो फिटनेस टेस्ट पार करणे बंधनकारक असताना मुंबईकर रोहित शर्माला दोनदा संधी देऊनही त्याला हा अडथळा पार करता आला नव्हता. अखेर बुधवारी बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये यो-यो फिटनेस टेस्टसाठी असलेला 16:1 गुणांचा फॉर्म्युला यशस्वीपणे पार करत रोहित शर्माने आपली लंडनवारी निश्चित केली आहे. आता विराटसेनेसोबत तो 23 जून रोजी इंग्लंड दौर्यासाठी रवाना होणार आहे. परदेशात सुट्टीसाठी गेल्याने रोहित शर्मा 15 जून रोजी पहिल्यांदा यो-यो फिटनेस टेस्टला सामोरा गेला. मात्र या तंदुरुस्त चाचणीत तो फेल ठरला. अखेर त्याच्या विनंतीवरून बीसीसीआयने त्याला दुसरी संधी दिली. मात्र मंगळवारी होणार्या टेस्टसाठी तो हजर राहिला नाही. आता बुधवारी झालेली यो-यो फिटनेस टेस्ट आपण पार केल्याचे रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम पेजवर म्हटले आहे.
रहाणेचं काय होणार?
रोहित शर्मा जर या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला तर त्याच्या जागी मुंबईच्याच अजिंक्य रहाणेला एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 सामन्यांसाठी सज्ज राहायला सांगितले होते. मात्र आता रोहित शर्मा यो-यो फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्यामुळे रहाणेचे काय होणार, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. 3 जुलैपासून सुरू होणार्या इंग्लंड दौर्यात भारतीय संघ तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि पाच कसोटी सामने खेळणार आहे.