विधानपरिषदेत आ. सुनिल तटकरे यांचा संतप्त सवाल
मुंबई : रोहा परिसरात सर्व रासायनिक कारखाने आहेत. अँन्थिया आरोमा कंपनीला लागलेल्या आगीच्यावेळी ४० ते ५० हजार लोकांचा जीव धोक्यात आला होता. तुम्हाला रोह्याचे दुसरं भोपाळ करायचं होतं का? असा संतप्त सवाल आ. सुनिल तटकरे यांनी विधानपरिषदेत केला. दरम्यान उदयोगमंत्र्यांनी उत्तर देताना लवकरच रोहा एमआयडीसी परिसराचा दौरा करुन बैठक लावण्याचे व त्वरीत तोडगा काढण्याचे आश्वासन सभागृहामध्ये दिले.
तटकरे यांनी रोहा (रायगड) येथील एमआयडीसीमधील अँन्थीया आरोमा रासायनिक कारखान्यामध्ये लागलेल्या आगीचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. मात्र सभागृहामध्ये उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने आ. सुनिल तटकरे समाधान झाले नाही . ग्रामस्थांना प्रशासनाने स्थलांतरीत केले नाही तर ते भीतीपोटी बाहेर गेले असा खुलासा त्यांनी केला.
ज्या कंपनीमध्ये आग लागली त्यानंतर संबंधित यंत्रणा चार तासाने त्या ठिकाणी पोहचली. मला आगीची माहिती मिळताच यंत्रणेशी संपर्क साधला. त्या विभागाच्या प्रतिनिधी आणि रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. मी स्वत:सर्वांना फोन केले आहेत. परंतु उद्योगमंत्री ग्रामस्थाना स्थलांतरीत केल्याचे खोटे सांगत आहेत असे तटकरे यांनी सांगितले.