लँड माफिया घुसले ‘ग्रीन झोन’मध्ये !

0

पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे, चिखली, पंतनगर भागात बेकायदा प्लॉटिंग विक्री सुरू
महापालिका पदाधिकार्‍यांचा वरदहस्त : हजारो सामान्य नागरिकांनी लाखो रुपयांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड : शहराच्या ठिकाणी स्वत:च एक घर असावं, हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. जागा घेऊन घर बांधणे हे तर त्यापेक्षा स्वप्न! याच मानसिकतेचा फायदा उठवत लॅण्ड माफियांनी चक्क पिंपरी-चिंचवडमधील ग्रीन झोनचा बाजार मांडला आहे. पॉश राहणी, चकचकीत कार्यालय आणि कमिशनवर नेमलेल्या बोलबच्चन एजंटांचा ताफा एवढ्याच भांडवालवार राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताने दररोज लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे. स्वप्न पुर्ण करण्यासाठी आयुष्यभराची पुंजी सामान्य माणूस प्लॉटसाठी देतो. मात्र, प्लॉट नावावर होत नसल्याचे अगदी अखेरच्या क्षणी समजल्यानंतर तो संपूर्ण उध्वस्त होतो. याविरोधात काही आवाज उठवावा इतपर्यंतही त्याच्या अंगात त्राण उरत नाही. आणि एखाद्या अंगात असलाच जोर तर त्याला राजकीय दबावातून त्याची मुस्कटदाबी केली जाते…हा सारा प्रकार तळवडे, चिखली, पंतनगर या भागात सुरू आहे. आता या लॅण्डमाफियाची नजर चिखलीमधील शेतजमिनीवर गेली आहे. चिखली येथील गट नं. 754/755 मधील शेतजमीन ग्राहकांची दिशाभूल करून विकण्यास सुरूवात केली आहे.

असे आहे फसवणुकीचे चक्र
लॅण्डमाफिया शहराजवळील एखाद्या शेतकर्‍याची शेजजमीन अगदी कमी दरात विकत घेतात. नंतर या जागेवर प्लॉट पाडतात. मग अनधिकृतपणे शेतजमिनीची रहिवास वसाहतीसाठी विक्री करतात. यामध्ये महापालिकेच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात नाही. लॅण्ड माफिया स्वत:ला सोयीस्कर अशा पद्धतीने जागेचा ले-आऊट तयार करतात आणि तोच ग्राहकांना दाखवतात. या ले-आऊटमध्ये ग्राहकाला भुरळ पडेल, अशा सर्व सुविधा दर्शविलेल्या असतात. त्यातच इतर जागेपेक्षा कमी दर आणि सर्व सुविधा हाकेच्या अंतरावर मिळणार असल्याचे गाजर हे माफिया व त्या ग्राहकाला दाखवितात. तसेच अशी जागा इतरत्र कोठेही मिळणार नाही, अशा भूलथापा एजंटही मारतात. साहजिकच आयुष्यभर पै-पै गोळा करून जमविलेली पुंजी तो जागेच्या मोबदल्यात माफियाच्या हाती सोपवितो.

डोक्याला हात लावण्याची वेळ
पैसे मिळाल्यावर माफिया जागेचे कागदपत्र व व्यवहार ग्राहकाच्या हाती देतो. मात्र, हे सर्व ग्रीन झोन म्हणजे शेतीक्षेत्र असल्याचे समजते आणि त्याला डोक्याला हात लावण्याची वेळ येते. मात्र, लवकरच तुम्हाला आर झोन (निवासी क्षेत्र) करून देतो असे सांगतात. परंतु, अधिक चौकशी करता संबंधीत ग्राहकाला समजते की, आपला प्लॉट कधी आर झोन होऊ शकत नाही. सातबारावर नाव लावून देतो, जागेचा कागद करून देतो, पालिकेच्या सर्व सुविधा मिळवून देतो, अशी सगळी आश्‍वासनेच होतो. शेवटी त्याच्या पश्‍चातापाची वेळ येते. तसेच स्वत: फसलो आहोत या दु:खापेक्षा आपल्यासारखे आजुबाजुचे आणखी बरेचजण फसले असल्याचे समजल्यावर समाधान मानतो. काही तक्रार केल्यास कागदपत्रे रद्द करूया. या प्लॉटला खूप मागणी आहे. किंमती वाढल्या आहेत. प्लॉट विकला की पैसे देतो असे सांगतो. यामध्ये आपली जागाही जायची आणि पैसेही परत मिळायचे नाहीत, अशी भीतीमुळे असू दे जागा तर नावावर आहे ना अशी स्वत:चीच समजूत करून घेतो.

महापालिका पदाधिकार्‍यांची साथ
आतापर्यंत तळवडे, चिखली, पंतनगर या भागात लॅण्डमाफियांनी ग्रीन झोनमधील जागा विकण्याचा चांगलाच सपाटा लावला आहे. आर झोन करून देत असल्याच्या भुलथापामुळे ग्राहक लाखो रुपयांची गुंतवणूक जमीन खरेदीत करताना दिसत आहेत. आजपर्यंत या भागातील ग्रीन झोनमधील प्लॉट अनेकांनी विकत घेतले आहेत. मात्र, अजूनही खरेदी केलेली जागा अधिकृतरीत्या ग्राहकांच्या नावावर होत नाही. यासाठी ग्राहक जागा मालकाच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. पण अनेकांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येत नसल्यामुळे विक्रेत्याचे फावते आहे. आता या लॅण्डमाफियाची नजर चिखलीमधील शेतजमिनीवर गेली आहे. चिखली येथील गट नं. 754/755 मधील शेतजमीन ग्राहकांची दिशाभूल करून विकण्यास सुरूवात केली आहे. ही जागा शहरातील अतिशय प्रतिष्ठीत परप्रांतीय बांधकाम व्यावसायकाची असून याला महापालिकेतील काही राजकीय पदाधिकार्याची साथ आहे.

या प्रकाराला लगाम कधी?
ग्रीनझोनच्या या गोरख धंद्याला लगाम कधी घालणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पण राजकीय पुढार्‍यांच्या पाठिंब्याने दिवसा ढवळ्या कष्टकरी लोकांच्या पैशावर सरळ सरळ डल्ला मारण्याचाच हा प्रकार आहे. जबाबदार अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे याकडे हेतुपुस्सर दुर्लक्ष आहे. हे सामान्याना न समजणारे कोडेच आहे. या सर्व प्रकारचा गैर फायदा काही जमीन एजंट घेऊन जमिनीचा व्यवहार करताना ग्राहकांना आमिषे दाखवून त्यांची लूट करताना दिसतात . सातबारावर नाव लावून देतो, जागेचा कागद करून देतो, पालिकेच्या सर्व सुविधा मिळवून देतो, अशा त्यांच्या आश्‍वासनांना बळी पडून ग्राहक जागा खरेदी करतात. परंतु खरेदी केलेली जागा नावावर होत नसल्याने शेवटी ग्राहकांवर पश्‍चातापाची वेळ येत आहे.

गुंठ्याला पंचवीस लाख!
जागेचे दर गगनाला भिडले आहेत. आता शहरात जागाच शिल्लक राहिलेली नाही. तसेच शहरी भागापेक्षा शहराजवळच्याच ग्रामीण भागात राहण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर परिसरातील जागांना सोन्याचे भाव आले आहेत. एक गुंठा जागा घ्यायची असेल तर ग्राहकाला त्यासाठी 20 ते 25 लाख रूपये मोजावे लागतात. लॅण्डमाफिया लोकांची गरज ओळखून जागेच्या किमती फुगवत चालले असून सर्वसामान्य ग्राहक मात्र यामध्ये भरडून निघत आहे.