लंकेश यांच्या हत्येचा नवी मुंबईत निषेध!

0

नेरुळ । पत्रकार गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबरला गोळ्या घालून त्यांच्या राहत्या घराबाहेर अज्ञात मारेकर्‍यांनी हत्या केली होती. संपूर्ण देशात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पत्रकार लंकेश यांच्या हत्येचा आज नवी मुंबईतील पत्रकारांकडूनदेखील निषेध व्यक्त करण्यात आला. वाशी येथील शिवाजी चौकात आज गुरुवार सकाळी 11 वाजता नवी मुंबईतील पत्रकारांनी एकत्र येऊन या लंकेश यांच्या हत्येविरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

यावेळी पत्रकार लंकेश यांच्या मारेकर्‍यांना तत्काळ अटक झालीच पाहिजे, पत्रकार लंकेश यांना न्याय मिळालाच पाहिजे. हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवा, अन्यायाविरोधात सतत लढणार्‍या पत्रकारांसाठी पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे, आशा विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी पत्रकार नारायण जाधव, अनिलकुमार उबाळे तसेच प्रदीप वाघमारे यांनी निषेधाचे थोडक्यात भाषण करून मार्गदर्शन केले. यावेळी वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार उपस्थित होते. यावेळी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.