लंकेश यांच्या हल्लेखोरांना अटक करा

0

बारामती । बंगळुरू येथे पत्रकार गौरी लंकेश यांचा काही समाज कंठकांनी गोळ्या घालून खून केला. या घटनेचा बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी या आशयाचे निवेदन बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांना पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने दिले.

बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश आळंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नाविद पठाण, सचिव चिंतामणी क्षीरसागर, सल्लागार वसंत मोरे, सदस्य हेमंत गडकरी, राजेश वाघ, रामदास जगताप उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत हल्लेखोरांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच अशा घटना निंदनीय असून समाज विघातक शक्ती लोकशाहीला मारक असल्याचे सांगत पत्रकार संरक्षक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तहसीलदार हनुमंत पाटील यांनी अशा घटनांबाबत चिंता व्यक्त करत पत्रकार संघाच्या भावना शासन दरबारी पोहचविण्याचे आश्‍वासन दिले.