बेंगळुरू । पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी लेखक विक्रम संपत यांचा जबाब विशेष तपास पथकाने (एसआयटी) नोंदवला आहे. देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे असा आरोप करत अनेक साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याची मोहीम उघडली होती. यासंदर्भात गौरी लंकेश व लेखक विक्रम संपत यांनी एकमेकांविरोधात लेख लिहिले होते. याच विक्रम संपत यांची एसआयटीने चौकशी केली आहे. संपत यांचे कुणाशी धागेदोरे जुळलेले आहेत, हे मात्र अजून तपास यंत्रणांनी स्पष्ट केलेले नाही. संपत यांनी एसआयटीकडून चौकशी झाल्याचे एका वृत्तसंस्थेला सांगितल्याने तपासाची ही बाजू उजेडात आली आहे.
गौरी यांनी माझी बदनामी केली होती
या चौकशी संदर्भात लेखक विक्रम संपत यांनी नाराजी व्यक्त केली असून ते म्हणाले, एसआयटी अधिकार्यांचा माझी चौकशी करण्यामागचा दृष्टीकोन मला पटला नाही. तरीही कायद्याचे पालन करणे हे कर्तव्य असल्याने मी त्यांना सहकार्य केले. मला हे मान्य आहे की मी गौरी लंकेश यांच्या विरोधात लेख लिहिला होता. मात्र या लेखाला गौरी लंकेश यांनी प्रत्युत्तरही दिले होते. एसआयटीचे अधिकारी माझ्या चौकशी आधी हा विचारही करू शकत होते. कारण गौरी लंकेश यांच्या विरोधात मी लेखन केले असले तरीही गौरी लंकेश यांच्या लिखाणामुळे माझी बदनामी झाली, असाही आरोप संपत यांनी केला आहे.
अद्याप धागेदोरे नाही
संपत यांची शुक्रवारी चौकशी करण्यात आली. गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबरच्या रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर या घटनेची चौकशी विशेष तपास पथकाकडून केली जाते आहे. अद्याप याप्रकरणी पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत. दरम्यान, देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे असा आरोप करत 2015 मध्ये अनेक लेखक आणि साहित्यिकांनी सरकारी पुरस्कार परत करण्याची मोहिम हाती घेतली होती. याच संदर्भात गौरी लंकेश यांनी संपत यांच्याविरोधात एक लेख लिहिला होता. या लेखाचे पडसाद बेंगळुरू साहित्य संमेलनावरही उमटले होते. काही कन्नड लेखकांनी या साहित्य संमेलनात सहभाग घेण्यासही नकार दिला होता.
पंतप्रधानांच्याही विरोधात लिहिले होते
गौरी लंकेश या एक निडर पत्रकार होत्या, त्यांची हत्या होणे दुर्दैवी आहे. गौरी लंकेश यांनी आजवर पंतप्रधानांच्या विरोधात लिहितानाही धाडसी भूमिका घेतली होती. मात्र त्यांच्या हत्येप्रकरणी माझी चौकशी केली जाते आहे. ज्यामुळे मी आणि माझे वृद्ध आई- वडील तणावात आहोत, या गोष्टीला काही अर्थ आहे का?
-विक्रम संपत