लंडनच्या ‘त्या’ स्टेडियमवर होणार वर्ल्डकपचे सामने

0

लंडन : लंडनमधील क्रिकेट स्टेडियमवर २०१९ साली होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे सामने होण्यार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विनंतीनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड गेल्या महिन्यात जास्त प्रेक्षक क्षमतेच्या स्टेडियमच्या शोधात होते. लंडन स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यासाठीची क्षमता असल्याची माहिती पाहणीनंतर समोर आली आहे. लंडन स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ६० हजार इतकी आहे. लंडनमधी हे सर्वात मोठे स्टेडियम आहे. मात्र, क्रिकेट खेळाडूंना आवश्यक सोयी-सुविधांच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

आयोजनाबाबत शंका उपस्थित
स्टेडियमवर क्रिकेटची खेळपट्टी निर्माण करण्याचेही प्रकरण खर्चीक असल्याने सामन्याच्या आयोजनाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. याशिवाय, स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी खूप आधीपासूनच त्यासाठीची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे विश्वचषक सामन्यांपूर्वी देखील हे स्टेडियम फुटबॉल किंवा इतर कोणत्याही खेळासाठी वापरता येणार नाही. मग या काळात फुटबॉल चाहत्यांना फुटबॉल स्पर्धेला मुकावे लागणार आहे. अशाप्रकारे वरील सर्व अडथळे दूर झाल्यास लंडन स्टेडियमवर २०१९ साली क्रिकेट विश्वचषकाचा सामना पाहायला मिळेल. याच स्टेडियमवर याआधी २०१२ साली ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सामन्यांचा आनंदासाठी आयसीसीकडून प्रयत्न
२०१९ साली इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा खेळविण्यात येणार असून लॉर्ड्स, ओव्हल, ट्रेंट ब्रिज, एजबस्टन, ओल्ड ट्रॅफर्ड, हेडिंग्ले , कार्डिफ, साउथॅंप्टन, चेस्टर-ले-स्ट्रीट आणि ब्रिस्टॉल या स्टेडियम्सवर विश्वचषकाचे सामने होणार आहेत. लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमची सर्वाधिक ३० हजार प्रेक्षक क्षमता आहे. २०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियात मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. मेलबर्न हे सध्याचे जगातील सर्वाधिक प्रेक्षक संख्येचे स्टेडियम समजले जाते. ९० हजार प्रेक्षक संख्या असलेले हे स्टेडियम विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी हाऊसफुल्ल झाले होते. त्यामुळे आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांना विश्वचषक सामन्यांचा आनंद घेता यावा यासाठी आयसीसीकडून प्रयत्न सुरू आहेत.