लंडन । शनिवारच्या रात्री पुन्हा एकदा लंडन दहशतवादी हल्ल्यामुळे हादरले आहे. लंडनमध्ये शनिवारी रात्री दोन ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन हल्लेखोरांचा खात्मा झाला आहे. या हल्ल्यात 30 हून अधिक जण जखमी झाले असून जखमींना शहरातील तीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर लंडनमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
रात्रीच्या अंधारात केला हल्ला
स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री हल्लेखोरांनी लंडन ब्रीजवर भरधाव गाडी चालवून पादचारी मार्गावरील लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी बरो मार्केटमध्ये जाऊन नागरिकांवर चाकूहल्ला केला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांच्या कारवाईत तिन्ही हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला. यानंतर पंतप्रधान थेरेसा मे यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर लंडनमधील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. या दोन्ही घटनांनंतर लंडन ब्रीज आणि बरो मार्केट रिकामे करण्यात आले असून, तिथे मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे.
काही दिवसांतच पुन्हा हल्ला
काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात 23 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर परत हा हल्ला झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हल्ल्याचा निषेध केला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याच्या तपासात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
हल्ल्यानंतर भारत-पाक सामन्यातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ
या दहशतवादी हल्ल्यानंतर बर्मिंगहॅममध्ये होणार्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली. सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा युरोपमधील गुप्तचर यंत्रणांनी दिल्याचे वृत्त असून या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ केल्याचे समजते. चॅम्पियन्स ट्रॉफीत आज (रविवारी) भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी बर्मिंगहॅमच्या मैदानात भिडले. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचे पडसाद भारत-पाक क्रिकेट सामन्यावरही उमटले. मध्य लंडनमध्ये ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तिथून स्टेडियम 208 किलोमीटर अंतरावर आहे. पण लंडनमध्ये महिनाभरात दुसर्यांदा हल्ला झाल्यावर बीसीसीआय आणि पीसीबीच्या पदाधिकार्यांशी गुप्तचर यंत्रणेने संपर्क साधला. खेळाडूंच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जात असल्याची ग्वाही अधिकार्यांनी दोन्ही बोर्डांना दिली आहे.
तसेच बोर्डाचे पदाधिकारी किंवा खेळाडूंनी सुरक्षेसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळावे असे आवाहनही अधिकार्यांनी केले आहे. प्रसारमाध्यमांना सांगितल्यास नाहक भीतीचे वातावरण निर्माण होईल असे गुप्तचर यंत्रणेचे मत आहे. गेल्या महिन्यात मँचेस्टरमध्ये हल्ला झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत आधीपासूनच वाढ करण्यात आली आहे, असे अधिकार्यांनी निदर्शनास आणून दिले. आयसीसीनेही हल्ल्यानंतर प्रसिद्धी पत्रक काढून चिंता करण्याची गरज नाही असे म्हटले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत सुरक्षेवर भर दिला जात असून संभाव्य धोका पाहता वेळोवेळी सुरक्षा दलातील अधिकार्यांशी चर्चा सुरू असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.