धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे ट्रॅव्हल्सद्वारे होणारी गांजाची तस्करी रोखत 36 हजारांच्या गांजासह तरुणाच्या मुसक्या आवळल्या. गुरुवारी रात्री 9.15 वाजता ही कारवाई नगाव गावाजवळ करण्यात आली. निरज ललित कथुरीया (25, वाबळे कॉलनी, फकिरवाडा, अहमदनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना इंदौर ते गोवा दरम्यान जाणार्या ट्रॅव्हल्समधून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नगाव गावाजवळ गुरुवारी रात्री सापळा रचण्यात आला. बाळासाहेब सूर्यवंशी व नायब तहसीलदार भाया भिमसिंग पावरा यांच्या उपस्थितीत मुंबई-आग्रा महामार्गावरील नगाव गावाजवळील हॉटेल अमोलजवळ सापळा रचल्यानंतर रात्री सव्वानऊ वाजता ट्रॅव्हल्स (क्रमांक एम.पी. 09 एफ.ओ. 9153) आल्यानंतर तिची तपासणी केल्यानंतर संशयीत कथुरीया यास ताब्यात घेण्यात आले. संशयीताच्या ताब्यातून चार किलो 855 ग्रॅम वजनाचा व एकूण 34 हजार 130 रुपये किंमतीचा गांजा व मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपी निरज ललित कथुरीया याच्याविरोधात कमलेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब सूर्यवंशी, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, प्रकाश सोनार, संदीप सरग, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, सागर शिर्के, गुलाब पाटील आदींच्या पथकाने केली.