लक्झरी-गॅस टँकर अपघात : सात मयतांची ओळख पटली

0

धुळे : तालुक्यातील अंजग शिवारात भरधाव लक्झरी व गॅस टँकरमध्ये धडक होवून दोन्ही वाहनांना लागल्याची घटना सोमवार, 18 रोजी घडली होती. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरत-नागपूर महामार्गावरील अजंग शिवारातील भिरडाणे फाट्यानजीक जळगावकडून धुळ्याच्या दिशेने येणारी खाजगी लक्झरी बस (एम.एच.01 डीक्यू 5495) व समोरून येणार्‍या गॅस टँकर (एम.एच.40 बी.जी.5793) ची धडक होवून दोन्ही वाहनांच्या डिझेल टाक्या फुटल्यानंतर वाहनांना आग लागली होती.

आगीत सात जणांचा झाला कोळसा
टँकर चालक राजकुमार बोनी राम सरोज (45, रा.जोनपुर, उत्तर प्रदेश), लक्झरी चालक रुपेश सुधीर लंबोर (35, रा.मालवण, सिंधुदुर्ग), संतोष वसंत तेली (36, रा.कणकवली, सिंधुदुर्ग) तसेच टँकरमधील प्रवासी कृपाशंकर छोटेलाल जैस्वाल (48), हिरालाल बनारसी (55), दीपक रामबली (21), अखिलेश कुमार संतोष कुमार (20, सर्व रा.घाटकोपर मुंबई) असे एकूण सात जण या अपघातात मयत झाले आहेत. धुळे तालुका पोलिसात अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे करीत आहेत.