हडपसर । सोलापूर रस्त्यावरील रात्रीचा लक्झरी बस थांबा व त्यामुळे होणारी प्रचंड वाहतूककोंडी याविरोधात स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढून याबाबतचे निवेदन, वाहतूक विभागाला दिले. या निवेदनातून स्थानिक रहिवाशांनी वाहतूककोंडीचा होत असलेला त्रास व त्याचा गंभीरतेने विचार करण्याचे निवेदन वाहतूकशाखेला दिले आहे.
मोर्चामध्ये स्थानिक सोसायटीचे अध्यक्ष, सभासद व बहुसंख्य स्थानिक नागरिकांनी सहभागी होऊन या वाहतूककोंडीबाबत प्रशासनास जागे केले. मोर्चामध्ये त्रिवेणी नगर सोसायटी, भोसले गार्डन, भोसले पार्क, कुबेर संकुल सोसायटी, बँकर कॉलनी, गजानन कॉलनी, अथर्व पूर्वा (ए) सोसायटी, सत्यराज सोसायटी, अमर समृद्धी सोसायटी व इतर सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव व सभासदांनी सहभाग घेतला होता. वाहतूककोंडीचे निवेदन देताना यावर ताबडतोब व कठोर कारवाई करण्याचा, तसेच वाहतूककोंडीचा गंभीरतेने विचार करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला.