लक्षवेधीद्वारे धनंजय मुंडे धारेवर धरणार सरकारला

0

मुंबई । राज्य शासनाने पहिल्यांदाच स्थापन केलेल्या महाराष्ट्र अ‍ॅक्युपंक्चर काउंसिलमधील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या चुकीच्या पद्धतीने झाल्या असून, त्याची नि:पक्षपातीपणे चौकशी करून, तत्काळ काउन्सिल बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र, अद्याप कारवाई न झाल्यामुळे येत्या पावसाळी विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे ते सरकारला धारेवर धरणार आहेत.दरम्यान, याप्रकरणी अ‍ॅक्युपंक्चर डॉ. दादाराव डाकले यांनी महाराष्ट्रातील अ‍ॅक्युपंक्चर डॉक्टरांच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, न्यायालयाने याबाबत झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र सरकार, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे व काउन्सिलच्या 6 सदस्यांना नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे हे काउंसिल ज्या कारणांसाठी स्थापन झालेले आहे तो हेतू साध्य होणार नाही, अशी शंका याचिकेत व्यक्त केली तसेच धनंजय मुंडे यांच्या पत्रातही तसा उल्लेख आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांना अंधारात ठेवले गेले असून, त्यांच्याकडून ही नियुक्ती करून घेतली आहे. म्हणूनच या क्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी हे काउंसिल बरखास्त करावे व महाराष्ट्रातील नामवंत तज्ज्ञांना नियुक्त करण्यात यावे, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.