लक्षात ठेवा, हे शाप, तळतळाट भोवतील!

0

मौन हे तुमचे सर्वश्रेष्ठ सुरक्षाकवच असते; जेव्हा तुम्ही राजकारणात, सत्तेत किंवा देशाच्या सर्वोच्चपदावर असता. देशाचे बोलके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सद्या याच विचाराचा अवलंब चालविलेला दिसतोे. एरवी जगभरातील घटनांवर टिवटिवाट करणारे मोदी, प्रत्येक राजकीय मुद्द्यावर बोलणारे मोदी सद्या बालमृत्यूकांडावर मौन पाळून आहेत. या बालमृत्यूकांडाने त्यांना वेदना झाल्याचे ते दर्शवित असले तरी, त्यांनी जास्त काही बोलणे टाळले. जेव्हा जेव्हा देशात काही आपत्ती येते, सत्ताधारी म्हणून अपयशाचे खापर मोदींवर फुटते किंवा ते संशयाच्या भोवर्‍यात सापडतात तेव्हा तेव्हा मोदी मौनच पाळतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रसार-प्रचार विभागाने आणि देशातील कथित मोदीभक्तांनी त्यांना आता फक्त ‘अवतार पुरुष’ एवढेच काय ते म्हणायचे बाकी ठेवले आहे. अन्यथा, इतर सर्व विशेषणे वापरून झाली आहेत. देशातील बहुतांश मंडळीही मोदींना सर्वशक्तिमान, सर्वज्ञ वैगरे वैगरे समजत असतात. त्यांना मोदींकडून फार मोठ्या अपेक्षाही आहेत, दुर्देवाने मात्र त्या काही पूर्ण होताना दिसत नाहीत. जगाच्या पाठीवरील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रांचे नेतृत्व अशा व्यक्तींच्या हातात गेले आहे, ज्यांच्याकडे सत्ता येणे हाच एकमेव चमत्कार म्हणावा लागेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. या दोन्ही नेत्यांकडे लोकशाही राष्ट्रांचे आलेले नेतृत्व निव्वळ चमत्कार असून, जगासाठी धोकादायक आहे. ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट‘ असा नारा देऊन जनमत जिंकले, तर मोदींनी ‘अच्छे दिन‘ दाखविण्याचे गाजर दर्शविले. या दोन्ही नेत्यांमध्ये एकच साम्य आहे, दोघेही कमालीचे कडवट धर्माभिमानी असून, धर्मनिरपेक्षता मूल्याचे संरक्षण ते करू शकत नाहीत. त्यामुळे धार्मिक विद्वेषाचे धुके त्यांच्या सत्ताकाळात सर्वत्र दाटून आले आहेत. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातील लोकशाही व्यवस्था सद्या कमालीची अडचणीत आली आहे. ट्रम्प असो की मोदी हे दोघेही नेते संवेदनशील नाहीत. प्राप्त परिस्थितीबाबत गंभीर नाहीत, अन् दोघेही युद्धखोर मानसिकतेचे आहेत. त्यामुळे युद्ध करण्यासाठी ते आतूर झाले असून, त्यांच्यामुळे जागतिक पातळीवरील संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. हा मुद्दा येथे मांडण्याचे कारण म्हणजे, मोदींसारख्या नेतृत्वाकडे जेव्हा सत्ता जाते, तेव्हा अनेक प्रश्‍न निर्माण होतात. त्या प्रश्‍नांप्रती ते गंभीर नाहीत हे जेव्हा आढळून येते, तेव्हा त्या प्रश्‍नांनी उग्ररुप धारण करण्यास सुरुवात केलेली असते.

उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात प्राणवायूचा पुरवठा खंडित झाल्याने तब्बल 70हून अधिक बालके दगावली. हे बाल मृत्यूकांड निव्वळ सरकारी दुर्लक्षामुळे झाले आहे. प्राणवायू पुरवठा करणार्‍या संस्थेने देयक अदा करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनदेखील त्यांचे देयक दिले गेले नाही. त्यामुळे संबंधित संस्थेनेही कमालीची निदर्यता दाखवत, प्राणवायू पुरवठा बंद केला. परिणामी, एकेक करून 70 बालके मृत्युमुखी पडली. ही घटना म्हणजे असंवेदनशीलतेचा, हलगर्जीपणाचा अन् प्रशासकीय अनागोंदीचा कळस म्हणावा लागेल. बरं, या घटनेनंतर सत्ताधार्‍यांनी जी संवेदनशीलता दाखवायला हवी होती, तीही कुठे दिसून आली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत, काही डॉक्टरांना निलंबित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर मौन स्वीकारले. त्यांचे मौन हे बरेच काही सांगून गेले. त्याही पेक्षा संतापजनक बाब म्हणजे, सत्ताधारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी अशा घटना देशात काही पहिल्यांदाच घडलेल्या नाहीत. एखाद्या घटनेवरून राजीनामा मागणे हे काँग्रेसचे कामच आहे; पण, ही काही देशातील पहिलीच घटना नाही, असे वक्तव्य करून आपल्या डोक्यातील असंवेदनशीलता चव्हाट्यावर आणली. शहा यांचे वक्तव्य म्हणजे, त्यांची या घटनेबाबत बेफिकीरीच दर्शविते. दुर्देवी घटनेवर निव्वळ राजकीय वक्तव्य करून त्यांनी आपण ‘माणूस’ नाही तर निव्वळ ‘राजकारणीच’ आहोत, हेही दाखवून दिले. देशाच्या कथित सर्वशक्तिमान पंतप्रधानांना बालमृत्यू रोखता येत नसेल तर; या पंतप्रधानांच्या मोदीभक्त म्हणतात त्या चमत्कारिक नेतृत्वावर आता शंका येऊ लागली आहे. एरवी प्रत्येक घटनेवर ट्वीटरद्वारे भाष्य करणारे, मन की बातद्वारे गप्पा झोडणारे पंतप्रधान आता मूग गिळून का आहेत? याबाबत आम्हालाच नव्हे तर देशालाही आश्‍चर्य वाटत आहे. गोरखपूर घटनेने बालमृत्यूचा प्रश्‍न ऐरणीवर आला असला तरी, ही काही उत्तरप्रदेशपुरती मर्यादित समस्या नाही.

युनेस्कोच्या अहवालानुसार, जगात होणार्‍या एकूण बालमृत्यूपैकी 20 टक्के बालमृत्यू हे भारतात होतात. आपल्या देशात लहान मुले आणि महिलांच्या आरोग्याची नुसतीच हेळसांडच होत नाही, तर त्यांच्या तडफडून मरण्याकडेही कुणी गांभीर्याने पहात नाही. महाराष्ट्रासह आदिवासी राज्यांत तर दररोज कुपोषणाने बालमृत्यू होतच आहेत; अन् त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दरडावूनही कोणत्याही सत्ताधार्‍यांनी गांभीर्याने पाऊले उचललेली नाहीत. देशात सत्ता युपीएची असो की एनडीएची असो. बाल अन् महिलांच्या मृत्यूंबाबत कमालीचा उदासीन दृष्टीकोन सत्ताधारीवर्गाने ठेवला आहे. आताचे पंतप्रधान मोदी हे देशाची तुलना चीन अन् अमेरिकेशी करतात, परंतु आरोग्यासह अनेक बाबतीत आपण पाकिस्तानपेक्षाही मागे आहोत. हे वास्तव कदाचित त्यांच्या पचनी पडणारे नसेल. युनेस्कोच्या अहवालानुसार, भारतात 17 टक्के, नायजेरियात 15, पाकिस्तानात 8, कांगोत 7 आणि अंकोला या देशात 5 टक्के असे बालमृत्यूंचे प्रमाण आहे. ही आकडेवारी मोदींनी एकवेळ अभ्यासावी, म्हणजे चमत्कारिक नेतृत्व, युगपुरुष म्हणून जे भक्त त्यांचा अहोरात्र उदोउदो करत आहेत, त्या भक्तांच्या डोळ्यावरील झापड तरी दूर होईल. बालमृत्यू रोखण्यासाठी मोदींनी आता उशिरा का होईना प्रयत्न करावेत. अन्यथा, पुढील 15 वर्षात भारतात 12 लाख बालमृत्यू झालेले असतील. प्रगत देशाच्या तुलनेत भारतात बालमृत्यूंचे प्रमाण हे तब्बल सातपट अधिक आहे. तुम्ही कोणत्या धुंदीत देशाला महासत्ता करण्याचे स्वप्न पाहात आहात, कोणत्या नशेत तुम्ही युद्धखोरी चालवली आहे अन् चीन अन् पाकिस्तानसोबत युद्ध करण्याची खुमखुमी दाखवत आहात? संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारच्या काळात बालमृत्यू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले होते. त्यासाठी वैद्यकीय सुधारणांचे पर्वही सुरु झाले होते. परंतु, मोदी सरकारच्या काळात या उपाययोजनांची वासलात लागली. त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे गोरखपूर येथील बालमृत्यूकांड होय. बालमृत्यू हे वैद्यकीय दुरवस्थेचे जसे परिणाम आहेत, तद्वतच ते कुपोषणाचेही परिणाम असतात. त्यामुळे कुपोषण, वैद्यकीय सुविधा, ग्रामीण आरोग्य आदी महत्वाच्या बाबींसाठी युपीएच्या काळात अर्थसंकल्पातच ठोस तरतूद करण्यात आलेली होती. परंतु, आताच्या सरकारने यापैकी बहुतांश तरतुदी अन्य विभागाकडे वळवलेल्या आहेत. आरोग्य खात्यांकडे पुरेसा निधीच उपलब्ध नसल्याचे ठळकपणे सामोरे आले आहे. मोदी जेव्हा विविध देशाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत, तेव्हा देशातील आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, हे मात्र त्यांच्या निदर्शनास कसे येत नाही? देशात आरोग्य सेवेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रांवर 83 टक्के शल्यक, 75 टक्के प्रसुतीतज्ज्ञ आणि 83 टक्के बालरोगतज्ज्ञ यांची कमतरता आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या वैद्यकीय सेवेची कशी वासलात लागली आहे, याबाबत कल्पनाच करवत नाही. ग्रामीण भागातील 18 टक्के लोकांनाच आरोग्य केंद्रांचा लाभ होतो. या आरोग्य केंद्रातील कर्मचारी हे खासगी दवाखाने, खासगी रुग्णालयांचे अक्षरशः एजंट झाले असून, पेशंट रेफर करण्याचेही त्यांना पैसे मिळतात. एकप्रकारचा मोठा भ्रष्टाचार या क्षेत्रात माजला असताना, मोदींचे त्याकडे लक्ष कसे नाही? राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेसाठी 1800-2000 कोटी रुपयांपैकी 1300-1400 कोटी रुपये मंजूर होतात अन् पैकी दिडशे-दोनशे कोटीही खर्च होत नसतील, तर हा पैसा जातो कुठे? देशातील वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी, बाल व महिलांचे मृत्यू रोखण्यासाठी हा पैसा का खर्च होत नाही? देशाच्या बोलक्या पंतप्रधानांनी या प्रश्‍नाचे उत्तर द्यायला हवे. या देशातील दहा कोटी लोकांना अशाप्रकारचे एकवेळचे अन्न मिळत आहे की, ते जनावरांना खायाच्या लायकीचेही नाही. लोकांना अन्न देण्याची सोय युपीए सरकारने केली होती. त्या अंत्योदय वैगरेसारख्या योजनांची मोदी सरकारने पुरती वाट लावून टाकली. न्यूमोनिया, कुपोषण, डायरिया, एमआयव्ही, मेंदूज्वर यासारख्या आजारांनी देशात एका वर्षात 20 ते 25 लाख बालकांचा मृत्यू होतो. हे बालमृत्यू सरकारच्या मूर्खपणामुळेच झालेले असतात. मोदींना डोक्यावर घेणार्‍या भारतवासीयांनी या गंभीर बाबीकडे कधी गांभिर्याने पाहिले आहे का? जगात दरवर्षी दोन कोटी 80 लाख बालके जन्माला येतात. यापैकी पाच वर्षाखालील 90 लाख बालकांचा मृत्यू होतो. यातील 25 टक्के बालके ही भारतातील आहेत, ही आकडेवारी कधी थोर नेते मोदींनी आणि अत्यंत चिकित्सक अशा भारतीयांनी अभ्यासली आहे का? बालके मरतात तर मरू द्या; त्याचे राजकारण करू नका, अशा घटना काही नवीन नाहीत, असे जेव्हा सत्ताधारी म्हणतात ना तेव्हा त्यांच्या बुद्धिची कीव येते. देशाचे पंतप्रधान जेव्हा बालमृत्यूकांडावर तोंड बंद ठेवतात अन् निरर्थक मुद्द्यांवर बडबड करत बसतात, तेव्हा त्यांच्याही बुद्धिची कीव येते. गोरखपूर घटनेची फारसी काही चौकशी होणार नाही. या घटनेच्या चौकशीची मागणी चक्क सरन्यायाधीश जे. एस. खेहर व न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने फेटाळून लावली आहे. ही बाब उत्तरप्रदेश अन् केंद्रातील भाजप सरकारच्या पथ्यावरच पडली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता लवकरच थंडबस्त्यात टाकले जाईल. या प्रकरणावरून बोंब ठोकणार्‍या मीडियाचा कंडही आता शमला असेल. त्यामुळे काही दिवसांत हे प्रकरण प्रत्येकाच्या विस्मरणात जाईल. परंतु, ज्या माता-पित्याच्या पोटचा गोळा प्राणवायूअभावी तडफडून मेला, त्यांच्या काळजाच्या वेदना कुणाच्या लक्षात येईल का? त्यांनी दिलेला टळटळाट, शाप योगी अन् मोदींना भोवल्याशिवाय राहणार नाही. अशा किती माता-पित्यांचा शाप हे सरकार घेणार आहे? किती बालके अन् महिलांचे आणखी बळी हे सरकार जाऊ देणार आहेत? जागतिक पातळीवर शक्तिमान नेता म्हणून तुम्हाला उदयास यायचे आहे, त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. कथित भक्तांसाठी तुम्ही युगपुरुष आहात, त्यासाठीही भरभरून शुभेच्छा आहे. चीन अन् पाकिस्तानसोबत युद्ध करण्याची खुमखुमीही तुम्हाला आली आहे, तीही तुमची इच्छा देव करो अन् पूर्ण होवो. परंतु, इतके सगळे करूनही थोडाफार वेळ उरत असेल तर जरा बाल अन् महिलांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी काम करा. बालके ही देशाची संपत्ती आहेत, ही संपत्ती अशी किड्यामुंग्यासारखी तडफडून तडफडून मरणे चांगले नाही, ते तुमच्या कथित बलशाही नेतृत्वाला शोभणारे नाही, उलटपक्षी तुमची अन् देशाची लाज घालविणारी ती बाब आहे!
पुरुषोत्तम सांगळे- 8087861982