जळगाव । मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या लक्ष्मीनगरातील साई श्री मोबाईल दुकान अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री फोडून चार मोबाईल, सात ते आठ डिओ स्प्रे तसेच चॉकलेट व चार हजार रुपयांची रोकड असा एकूण 36 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी दुकान मालकांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, रविवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास गस्तीच्यावेळी पोलिसांना चॉकलेट तसेच डिओ स्प्रे व एक दुचाकी दुकानाच्या काही अंतरावर मिळून आले आहे.
चार मोबाईल, डिओ स्प्रे, रोकड लांबविली; आईस्क्रीम केले फस्त
आशाबाबानगरातील आरएमएस कॉलनीतील रहिवासी प्रविण रमेश वारडे यांचे मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या लक्ष्मीनगरात साई श्री मोबाईल दुकान आहे. तर रोज नेहमीप्रमाणे प्रविण हे सकाळी 10 वाजता दुकान उघडल्यानंतर रात्री 9.30 ते 10 वाजेदरम्यान दुकान बंद करतात. शनिवारी देखील रात्री प्रविण वारडे यांनी रात्री 10 वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप कटरने तोडून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील चार मोबाईल, 2 हजार रुपये किंमतीचे सात ते आठ डिओ स्प्रे, सहाशे रूपयांच्या चॉकलेट तसेच 4 हजार रुपयांची कॅश चोरून नेले. दरम्यान, दुकानात असलेले आठ ते दहा आईस्क्रीम देखील चोरट्यांनी फस्त केले. चोरट्यांनी एकूण 38 हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. सकाळी 7 वाजेच्या सुमारास दुकानाशेजारीच राहणार्या घाडगे कुटूंबियांना दुकानाचे शटर अर्धे उघडे दिसताच त्यांनी प्रविण वारडे यांना फोन करून चोरी झाल्याचे कळविले. प्रविण यांनी लागलीच दुकान गाठले आणि आत जावून पाहिल्यानंतर त्यांना संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. यानंतर रामानंद पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून दुकानाची पाहणी केली. ठसेतज्ञांचे पथक देखील पाचरण केले होते. अखेर प्रविण वारडे यांनी रामानंदनगर पोलिसात चोरीबाबात तक्रार दाखल केली.
दुचाकीसोडून चोरटे पसार
चोरट्यांनी शनिवारी रात्री खान्देश सेंट्रल येथून एक दुचाकी (एमएच 19 बीएस 2000) लांबवली. नंतर हीच दुचाकी घेऊन त्यांनी पहाटे 3.30 वाजता साईश्री मोबाईल हे दुकान फोडले. चोरीचा मुद्देमाल पोतडीत टाकून पळुन जात असतानाच रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाची नजर त्यांच्यावर पडली. सहाय्यक पोलिस उप निरीक्षक परदेशी, अर्जुन लावणे व वाहनचालक वासुदेव मोर या तीघांचे हे गस्ती पथक होते. पोलिसांनी चोरट्यांना पाहता त्यांच्या दिशेने वाहन पळवले. पोलिस मागे लागलेले पाहून चोरट्यांनी दुचाकीसह पळुन जाण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावरच त्यांना तोल गेल्याने दोघे चोरटे दुचाकीसह नाल्यात जाऊन पडले. पोलिसांची गाडी पोहचण्याच्या आधीच चोरट्यांनी नाल्यात पडलेली दुचाकी सोडून पळ काढला. परिसरातील सेंट जोसेफ स्कुलच्या मागच्या गल्लीत असलेल्या अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. पोलिसांनी नाल्यात पडलेली दुचाकी ताब्यात घेतली. तसेच पोलिसांना चोरलेल्या चॉकलेट तर काही डिओ स्प्रे यासह जुना कॅमेरा मिळून आले आहे. पोलिसांनी प्रविण यांना वस्तु दाखविल्या असता त्या त्यांच्याच असल्याचे त्यांनी ओळखले.