लक्ष्मीबाग नाल्यावरील झोपड्यांवर पालिकेची कारवाई

0

मुंबई । घाटकोपर येथील पंतनगर संजय गांधी नगर येथील लक्ष्मीबाग नाला रुंदीकरणात बाधित होणार्‍या झोपड्यांवर सोमवारी पालिकेने कारवाई केली. मात्र या ठिकाणी कारवाई करण्यास आलेल्या पालिकेच्या पथकाला येथील रहिवाश्यांच्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागल्याने बाधित झोपड्यांपैकी फक्त पात्र झोपड्यांवर कारवाई करण्यास यश आले आहे. घाटकोपर पंतनगर येथील लक्ष्मीबाग नाला रुंदीकरणात लक्ष्मीबाग ते मार्लेश्‍वर या विभागातील 1100 झोपड्यापैकी फक्त 48 झोपड्या पात्र ठरवण्यात आल्या आहेत. तर या नाल्यावरील संजय गांधी नगर येथील फक्त 15 झोपड्या पात्र ठेवण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या संरक्षणात कारवाई
यावर संजय गांधी नगर येथील फक्त 15 पात्र झोपडीधारकांची घरे तोडली जाणार असून इतरांची घरे तोडली जाणार नसल्याचे आश्‍वासन पंतनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल फडके यांनी देऊन रहिवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पालिकेने पात्र झोपडीधारकांची कारवाई केली. एन वार्ड पालिकेच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी अपात्र असणार्‍या झोपडीधारकांना 2012 च्या नवीन जी आर नुसार आम्ही पात्र करू व इतरांनाही सामावून घेऊ, असे आश्‍वासन अपात्र ठरलेल्या झोपडीधारकांना दिले.

नागरिकांकडून नाराजी व्यक्त
झोपड्या पात्र अपात्र करताना योग्य निकष लावले नसल्याने संजय गांधी नगरसह इतर विभागातील झोपडीधारकांमध्येही नाराजी पसरली होती. संजय गांधीनगरमध्ये पालिका कारवाई करण्यास येणार याची माहिती मिळताच शेकडो रहिवाशी पालिका अधिकार्‍यांना आमची घरे अपात्र का केली याचा जाब विचारण्यासाठी एकत्र आले होते. या कारवाई दरम्यान जे 30 ते 40 वर्षे या ठिकाणी राहत आहेत त्यांची घरे अपात्र आणि आता नव्याने आलेले तसेच राजकीय पक्षांशी संबंध असलेल्या रहिवाश्यांची घरे पात्र कशी झाली? आम्हाला नोटिसा आल्या नाहीत मग कारवाई कशी करता? आम्हाला घरे कुठे देणार? आमच्या मुलांच्या शाळांचे कॉलेजचे काय होणार? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले.