पुणे । शहरातील सर्वात वर्दळीच्या लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझाचा प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा याच रस्त्यावर फक्त पादचार्यांसाठी सुमारे 300 मीटर अंतराचा वॉकींग प्लाझा उभारण्याची प्रक्रीया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.
लिंब महाराज चौक ते शगुन चौक या दरम्यानच्या 400 मीटरच्या अंतरात प्रायोगिक तत्वावर हा वॉकिंग प्लाझा करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाकडून खास सल्लागारांची नेमणूक करण्यात आली असून त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या पथविभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी दिली. गुजरातमधील नर्मादा नदीकाठ विकसन प्रकल्पाचा आराखडा तयार करणार्या सल्लागार कंपनीकडूनच लक्ष्मी रस्त्याचा वॉकींग प्लाझा तयार करण्याचे काम सुरू आहे.
पार्किंग करणार बंद
या आराखडयाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतरच या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या पथ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. केवळ 300 मीटरसाठी हा वॉकींग प्लाझा असल्याने तसेच या अंतरामध्ये पार्किंगही बंद केले जाणार असल्याने त्यावर नागरिकांच्या सूचना महत्वाच्या असून त्यांच्या नंतरच हा प्रकल्प राबविला जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
वाहतूक बाजीराव रस्त्यावरून वळविणार
या मार्गावरील वाहतूक बाजीराव रस्त्यावरून केळकर रस्तामार्ग पुन्हा शगुन चौकाकडे वळविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. यासंबधीचा अहवाल वाहतूक पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. या आराखड्याचे सादरीकरण महापौर मुक्ता टिळक यांनाही करण्यात आले आहे.