मुंबई । श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती-शिवाजी पार्क आयोजित आंतर शालेय कबड्डी स्पर्धेमधील मुले गटात दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर मुलांचे माध्यमिक विद्यालय आणि मुलींमध्ये ठाण्याच्या लक्ष्मी विद्यामंदिर संघाने अजिंक्यपदासह रुपये पाच हजार पुरस्कार पटकविला. चुरशीच्या अंतिम फेरीत शारदाश्रम विद्यामंदिर संघाने दादरच्याच डॉ. अँटोनियो डा सिल्वा हायस्कूलचा 12 गुणांनी तर लक्ष्मी विद्यामंदिरने सायनच्या श्री गौरीदत्त मित्तल विद्यालयाचा 4 गुणांनी पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
शारदाश्रम विद्यामंदिर मुलांचे माध्यमिक विद्यालय संघाने कप्तान अभिषेक जाधवच्या अष्टपैलू खेळासह धडाकेबाज खेळ करीत पहिल्या डावात डॉ. अँटोनियो डा सिल्वा हायस्कूल संघावर दोन लोन दिले आणि मध्यंतराला 33-15 अशी मोठी आघाडी घेतली. दुसर्या डावात ऋषिकेश खेडेकरच्या अष्टपैलू खेळामुळे डॉ. अँटोनियो डा सिल्वा हायस्कूलने पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न करीत दोन्ही लोन फिरविले. परंतु प्रतिस्पर्धी संघाने संपूर्ण डावात 14 बोनस गुण घेतल्यामुळे शारदाश्रम विद्यामंदिरने 59-47 अशी बाजी मारली. शालेय मुलींच्या अंतिम सामन्यात राजश्री टेळेच्या अष्टपैलू खेळामुळे लक्ष्मी विद्यामंदिर संघाने अष्टपैलू रुणाली भुवडच्या गौरीदत्त मित्तल विद्यालयाचा 41-37 असा निसटता पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. गौरीदत्त मित्तल विद्यालय संघाला पहिल्या डावातील 4 गुणांची पिछाडी भारी पडली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईचा पुरस्कार अभिषेक जाधव व रुणाली भुवड यांनी तर सर्वोत्कृष्ट पकडीचा पुरस्कार ऋषिकेश खेडेकर व राजश्री टेळे यांनी पटकाविला.