कल्याण : कल्याण पश्चिम परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बँकेतून पैसे काढून येणार्या नागरिकांचे लक्ष विचलित करत अज्ञात चोरटे पैशांची बॅग घेऊन पसार होण्याच्या बॅग लिफ्टिंगच्या घटना वाढत होत्या. या वाढत्या घटना पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कल्याण महात्मा फुले पोलिसांनी या चोरट्याना जेरबंद करण्यासाठी बँकेसह बँकेच्या परिसरात गस्ती वाढवल्या. या दरम्यान महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकरी खातीब शेख आपल्या सहकार्यासह एक्सिस बँकेत गस्ती घालत होते. यादरम्यान एक तरुण हातात स्लिप घेऊन उभा होता. खातीब याना संशय आल्याने त्यांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले.
या तरुणाच्या हातातील स्लिप कोरी असल्याने त्यांच्या संशय बळावला. तो तरुण पैसे मोजणार्या नागरिकांवर लक्ष ठेवून होता. काही वेळाने रांगेत उभे असणार्या या तरुणाने अचानक रांगेतून काढता पाय घेत बँके बाहेर गेला. तेथे आपल्या साथीदारांना माहिती देत असतानाच खातीब आणि त्यांच्या सहकार्यांनी या तरुणाला पकडले. मात्र या झटापटीत त्याचे साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांना या तरुणाला अटक केली असून अरुण देड्डा असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे. तर देवा, चड्डी, कुंबळे हे त्याचे साथीदार पसार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तो आणि त्याचे साथीदार बँकेत जाऊन पैसे काढणार्या नागरिकांवर लक्ष ठेवायचे व बाहेर येताच त्यांच्याजवळील पैशांचे बॅग हिसकावून पळ काढायचे काही महिने उलटताच ते लुटलेला मुद्देमाल घेऊन थेट आंध्र प्रदेशला गावी पळून जायचे. काही दिवसांनी पुन्हा कल्याण गाठत चोर्या करत होते. तसेच ठेकेदार असल्याची बतावणी करत ते एखाद्या चाळीतील खोली भाड्याने घ्यायाचे. या चौकडीने आजमितीला कल्याण, भिवंडी येथे अशा प्रकारे चोर्या केल्याच तपासात निष्पन्न झाले आहे.