लग्नसमारंभात ‘खालू बाजा’ला मागणी

0

रत्नागिरी : डीजेच्या जमान्यातही आता ग्रामीण भागात लग्नसमारंभात खालू बाजाची मोठ्या प्रमाणात मागणी असलेली दिसते. ढोल, सनई, ताशा आणि टिमकीच्या वाद्यांतून निघणारा आवाज खर्‍या अर्थाने लग्नाची शोभा वाढवत आहे. त्यामुळे तालुक्यात लग्नसमारंभात अशा खालू बाजाला मोठ्या प्रमाणात मागणी असून आंबवणे खुर्द, तिडे येथील वैशिष्ट्यपूर्ण खालू सर्वांचेच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत.

लग्नसमारंभ पारंपरिक पद्धतीने अजूनही विविध विधी साग्रसंगीत केले जातात. वधू-वरांना हळद लावणे, माखू घालणे, मुहूर्तमेढ रोवणे, देवाक आणणे, गावाला निमंत्रित करणे, रुखवात नाचवणे, वधूची ओटी पोचवणे, वरात नाचवणे असे अनेक प्रकार संगीताच्या साह्याने पार पाडले जातात. त्यासाठी ग्रामीण भागात अजूनही खालू वाजंत्र्यांनाच पसंती दिली जाते. खालू बाजाच्या आवाज सर्वांना हे मंगल विधी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यासाठी प्रेरित करतो. सनईतून वेगवेगळ्या धून वाजवल्या जातात. ग्रामीण भागात सर्रास वाजणारी गाणी ऐकायला मिळतात. दोन खालू समोरासमोर आले की त्यांच्यात रंगणारी वाद्यांची स्पर्धा पाहण्यात वर्‍हाडी मंडळी हरखून जातात. आंबवणे खुर्द येथील वाजंत्री वेगवेगळ्या कसरती करत ढोल बडवताना विविध ठेक्यांवर वरातींना नाचवतात. या खालू वाजंत्र्यांची ही कला निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.

एका लग्नासाठी हे खालू कमीत कमी सात ते जास्तीत जास्त पंधरा हजारांची सुपारी घेतात. त्यामानाने त्यांना मिळणारे मानधन हे कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात वारंवार जाणारी वीज त्यामुळे वीजविरहित असणारी ही वाद्ये अशा वेळी कामी येत असून डीजेवर हजारोंचा खर्च करणार्या वधू व वरांकडील कुटुंबाला त्याचा दिलासा मिळत आहे.