दुष्काळ, थंडीच्या कडाक्याने आवक घटली
पुणे : नवीन वर्षाचे स्वागत, मार्गशीर्षचा शेवटचा आठवडा आणि जोरात सुरू असलेल्या लग्नसराईमुळे फुलांनी भाव खाल्ला आहे. मार्केट यार्डातील फुलबाजारात शहर, उपनगर आणि जिल्ह्यातून फुलांना मोठी मागणी वाढली आहे. दुष्काळाचा फटका बसल्याने, थंडीने उत्पादन घटल्याने नेहमीच्या तुलनेत बाजारात फुलांची कमी आवक झाली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या फुलांचे भाव तेजीत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले आहे.
दिवाळीत फुलांना चांगला भाव होता. त्यानंतर फुलांना मागणी नव्हती. त्यामुळे भाव कमी होते. त्यानंतर आता मार्गशीर्ष सुरू असल्याने भाव वधारले असल्याचे फूलबाजार आडते व व्यापारी संघाचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांनी सांगितले.
शेवंती 150 रुपये किलो
मार्गशीर्ष महिन्यात गुरूवारी होणारे महालक्ष्मीचे पूजन, काही दिवसांपूर्वी झालेली दत्त जयंती, अंगारकी चतुर्थी आणि सुरू झालेल्या लग्नसराई यामुळे फुलांचे भाव वाढले आहेत. लग्नसराईमुळे कागड्याच्या गजर्याला सर्वाधिक मागणी असून, त्याची 400 ते 500 रुपये किलोने विक्री सुरू आहे. तर, वेणी बनवण्यासाठी लागणार्या शेवंतीच्या फुलांचा भाव 30 ते 70 रुपयांवरून 100 ते 150 रुपये प्रतिकिलोंवर पोहोचला आहे.
दर 40 टक्क्यांनी वाढले
सध्या लग्नसराई, स्वागत समारंभ सुरू असल्याचे सांगून व्यापारी सागर भोसले म्हणाले, सजावटीसाठी लागणार्या गुलाब, जर्बेरा, आर्किड, कार्नेशियन आदी फुलांना मोठी मागणी आहे. त्यामुळे त्यांचेही भाव 20 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. थंडीचा कडाका वाढल्याने गुलछडी, लिली, मोगरा, गुलाब आदी फुलांवर सर्वाधिक परिणाम होत आहे.