लग्नसराई धुमधडाक्यात, बँडबाजा जोरात तर नातेवाईक उन्हात

0

वरूळ (भिका चव्हाण) । दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लग्नसराईचा धुमधडका जोरात सुरू आहे.त्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे म्हणजेच बँडबाजा जोरात आणि नातेवाईक उन्हात अशी गत लोकांची झाली आहे. दरवर्षीप्रमाणे उपवर मुलांमुलींचे घरदार पाहण्यापासून ते लग्नजुळेपर्यंत आणि लग्न लागेपर्यंत लोकांची धावपळ सुरू असते. एकदाचे लग्न जुळल्यानंतर मुलांच्या किंवा मुलीच्या वडिलांची खरी कसरत सुरु होते. मंगल कार्यालय, मंडप,ब्राह्मण, घोडा, न्हावी, फोटोग्राफर ,लग्नपत्रिका छपाई करणे,स्वयंपाकी,थंड पाण्याची व्यवस्था करणे, वर्‍हाडी मंडळींना लग्नास्थळी नेण्यासाठी वाहन भाड्याने करण्यासाठी होणारी धावपळ, जुळवाजुळव करणे आणि सर्व जुळवणी केल्यानंतर खरी कसोटी सुरु होते ती म्हणजे निमंत्रण पत्रिका वाटप करणे. भर उन्हात मोटारसायकलीने गावोगावी फिरून नातेवाईकांपर्यंत आमंत्रण पत्रिका पोहच करणे.

वर्‍हाडींना प्रवासात अडचणी
यातच लग्न वेळेवर न लागणे, जेवण वेळेवर न मिळणे,पिण्याचे पाणी असूनही पुरेसे न मिळणे हे सर्व सहन करूनही लग्न आटोपल्यावर परतीच्या प्रवासात नागरिकांचे तीव्र उन्हामुळे जास्तच अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. प्रवासात तासनतास उन्हात उभे राहावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु एवढा त्रास सहन करून सुद्दा नातेवाईक लग्नाला प्रचंड संख्येने हजेरी लावताना दिसत आहेत.

उन्हामुळे त्रासात भर
पत्रिका पोहच झाल्यावर हळदीच्या रात्री दारू पिऊन धिंगाणा घालून नाचणारे मुलं यजमानांच्या मनात जास्तच धडकी भरवत असल्याचे चित्र प्रत्येक लग्न घरी दिसून येते. त्यात उन्हाळा जास्तच कसोटी घेत असल्याचे चित्र दिसत आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की लोक पूर्णतः हैराण झाल्याचे दिसत आहे.

नातेवाईकांची धावपळ
विविध लग्नसमारंभात सामिल होतांना बरेचसे नातेवाईक आपले जवळचे लग्न असल्याने सहकुटूंब, सहपरिवार जात असल्याचे दिसते तर काहीजण 3-4 लग्नाना धावपळ करून हजेरी लावतांना दिसतात. लग्नसराईचे दिवस असल्याने लोकांची गर्दी वाढली प्रवासी वाहने कमी पडू लागल्याने प्रवासात तासनतास उन्हात उभे रहावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. नातेवाईक जे वाहन मिळेल त्या वाहनाने लग्नाच्या नियोजित स्थळी पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.