लग्नाची पत्रिका मैत्रिणींना देण्याच्या बहाण्याने नियोजित वधूचे पलायन…!

0

धुळे। स्वत:च्या लग्नाच्या पत्रिका मैत्रिणींना देवून येते असे सांगून, लग्न अवघ्या चार दिवसावर असतांना साक्री रोड भागात राहणारी अभियांत्रिकी महाविद्यालयाची तरुणी बेपत्ता झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. तिच्या या कृत्यामुळे लग्नघरी रंगाचा बेरंग झाला आहे.

याप्रकरणी तिच्या काकांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.साक्री रोड परिसरात संत निरंकारी भवन मागे रामदास नगर या वसाहतीत राहणारी मुलगी मेेघा (बदलेले नाव)(वय 24) हिचे आज शनिवारी 3 जून रोजी लग्न होते. दि. 30 मे रोजी मेघा ही प्लेझर गाडी घेवून घरातून बाहेर निघाली. मैत्रिणींना लग्नपत्रिका वाटून येते असे सांगून संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास ती घराबाहेर पडली होती. मात्र, रात्री उशीरापर्यंत ती घरी परतलीच नाही. मेघाचे लग्न ठरल्याने कुटूंबात आनंदाचे वातावरण होते. नातेवाईकांना पत्रिकाही वाटल्या गेल्या. समाजात बदनामी नको म्हणून तिच्या आई-वडीलांसह जवळच्या नात्या गोत्यातील लोकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती सापडलीच नाही. त्यामुळे अखेरीस तिचे काकांनी तालुका पोलिस स्टेशन गाठून तिच्या मिसिंगची खबर दिली आहे. पुढील तपास एएसआय कैलास दामोदर करीत आहेत. मेघा हिचे बी.ई.पर्यंतचे शिक्षण झालेले आहे.