उन्हाच्या तडाख्याने केळी बागा कोमेजल्या
शेतकरी हवालदिल : फळ पीक विमा योजनेंतर्गत केळी उत्पादकांची नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा
सावदा : केळीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावदा व परीसरातील केळी उत्पादे शेतकरी यंदाच्या रणरणत्या उन्हामुळे चांगलाच होरपळून निघाला आहे शिवाय शेतात असलेली उभी केळी तळपत्या उन्हाने अक्षरशः कोमेजत आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.
उन्हाच्या तडाख्याने केळी बागा कोमेजल्या
यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवत आहे. एप्रिल महिना चांगलाच तापला तर मे सुरू होताच सूर्य जणू अक्षरशः आग ओकत असल्याचे जाणवत आहे. अश्या परीस्थतीत केळी उत्पादक शेतकर्यांना आपली केळी टिकवणे एक प्रकारचे दिव्य ठरत आहे. यंदा उन्हाने एप्रिलमध्येच 42 अंश पार पार केला होता तर एप्रिलचा शेवटचा आठवडा व मे महिन्याच्या सुरुवातीला सुमारे 44 ते 45 अंश तापमानावर पारा स्थिराला. येत्या काही दिवसात हा पारा आणखीन चढत जाणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे यंदा केळी या उन्हात टिकवणे अवघड झाले आहे. झाडावरून केळी घड मोठ्या प्रमाणत निसटत असल्याने तसेच केळी झाड उन्हामुळे शेकली जात असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान होत आहे. आधीच केळीस भाव नसल्याने शेतकरी संकटात असतांना आता या नैसर्गिक परीस्थितीमुळे शेतकरी आणखीन जास्त संकटात सापडला आहे.
बचावासाठी शेतकर्यांकडून अनेक उपाययोजना
उन्हापासून बचावासाठी शेतकरी अनेक उपाययोजना आपल्या केळी बागांभवती करीत आहे. कुणी शेताच्या बाजूने हिरवी नेट लावत आहे तर कुणी जुन्या साड्या वापरून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे तर कुणी शेताभोवती उंच वाढणारे गवत वा सायरी लावून उन्हाचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत मात्र उन्हाचा तडाखा एव्हढा आहे की या उपाययोजना सुद्धा फोल ठरून शेतकर्यांचे मोठे नुकसान उन्हामुळे होत आहे. आगामी काही दिवस केळीसाठी अधिक धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे.
पीक विमा योजनेंतर्गत मिळावी भरपाई
अशाी परीस्थितीत आता शेतकरी पीकविमा योजनेंतर्गत उच्च तापमानाची नोंद घेऊन त्या निकषानुसार केळी उत्पादक शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळते का? याबाबत देखील आशा लागली आहे. यंदा उन्हामुळे झालेले नुकसान मोठे असून अश्यावेळी केळी पीकविमा हा शेतकर्यास मिळावा, अशी रास्त अपेक्षा शेतकरी आता व्यक्त करीत आहे. लोकप्रतिनिधींनीदेखील लक्ष देऊन शेतकर्यांना शासकीय मदत अथवा केळी पीकविमा रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.