फैजपूर: मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल येथील मुलीच्या लग्नाचे स्वागत समारंभाचा अर्थात रिसेप्शनचा कार्यक्रम झाल्यानंतर चोपडाहून चिंचोलकडे जातांना वऱ्हाडाच्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. हिंगोणा येथे समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने क्रुझरला जोरात धडक दिली. या अपघातात दहा जण जागीच ठार, तर सात जण जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना आज सोमवारी पहाटे घडली. मृतांमध्ये ९ महिला तर १ पुरुष आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात इतका भीषण होता की, क्रुझरचा पूर्ण चुराडा झाला आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
मृतांची नावे याप्रमाणे
प्रभाबाई प्रभाकर चौधरी (वय 45), सोनाली जितेंद्र चौधरी (वय 35), मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 55), आश्लेषा उमेश चौधरी (वय 28), प्रभाकर नारायण चौधरी (वय 63), रिया जितेंद्र चौधरी (वय 10), प्रियांका नितीन चौधरी (वय 25, सर्व रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर), सुमनबाई श्रीराम पाटील (वय 60), संगीता मुकेश पाटील (वय 33, दोघ रा. निंबोल ता. रावेर), सोनल सचिन महाजन (वय 37, रा. चांगदेव,ता. मुक्ताईनगर) हे ठार आहेत.
जखमींमध्ये सर्वेश नितीन चौधरी, शंतनू मुकेश पाटील ,अन्वी नितीन चौधरी, मीना प्रफुल्ल चौधरी, सुनिता राजाराम चौधरी, आदिती मुकेश पाटील आणि शिवम प्रभाकर चौधरी (वय 16) हे जखमी आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती कळल्यानंतर राजकीय नेते, पदाधिकारी यांनी रुग्णालयात धाव घेत, कुटुंबियांची सांत्वन केले आहे.