लग्नाच्या मुहूर्तावर संपूर्ण परिवारासह वधू-वराचा नेत्रदानाचा संकल्प!

0

जळगाव । लग्नाच्या किंवा वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर अनोख्या उपक्रमाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. युवकांना प्रेरणा देणार्‍या उपक्रमांची नेहमीच चर्चा होत असते. जळगाव जिल्ह्यात सध्या अशाच एका राजकीय क्षेत्रातील युवकाचा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला आहे. युवासेनेचे युवा जिल्हाअधिकारी प्रीतेश ठाकूर यांनी आपल्या विवाहाच्या प्रसंगी आपली पत्नी आणि आई-वडिलांसह संपूर्ण परिवाराने नेत्रदानाचा संकल्प करून एक नवा पायंडा घातला आहे. या अनोख्या उपक्रमाचे होत आहे कौतुक सर्व स्तरांतून होत असून युवकांना खर्‍या अर्थाने प्रेरित करणारा असाच हा उपक्रम म्हणावा लागेल.

लग्नानंतर लगेच घोषणा
लग्नाच्या आधीपर्यंत प्रीतेश ठाकूर यांनी या गोष्टीची कुणालाही खबर लागू दिली नव्हती. ’सावधान….शुभ मंगलयम’ झाल्यानंतर टाळी लागली. वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्प माळा घातल्या. दोघांनी जीवनबंधनाची गाठ बांधली आणि लागलीच नेत्रदान करण्याचा संकल्प करीत असल्याची घोषणा त्यांनी केली व प्रमाणपत्र मिळविले. हा एक आगळा वेगळा प्रेरणा देणारा संकल्प जळगाव जिल्हा युवासेनेचे युवाजिल्हाधिकारी प्रितेश ठाकुर यांनी आपल्या नवविवाहिता पत्नीसह आई -वडिल यांच्या सोबत केला. त्यांच्या या कार्याचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

बाफना नेत्रपिढीचे सहकार्य
1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ’ दुर्वांकुर’ या शिरसोली रस्त्यावरील मंगल कार्यालयात जळगाव जिल्हा युवासेना युवाजिल्हाधिकारी प्रितेश ठाकुर यांचे ’शुभमंगलयम’ झाले. शिवसेना युवासेना पदाधिकार्‍यांची तसेच सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. सायंकाळी लग्न लागल्यानंतर नवरदेव प्रितेश व त्यांची नववधू आसावरी ठाकुर व प्रितेशचे आई व बाबा यांनी नेत्रदानाचा संकल्प लागलीच जाहीर केला. विवाह लागल्यानंतरचे विधी या नवदाम्पत्याचे नंतर उरकविले. अगोदर नेत्रदानाचा संकल्प उपस्थित वर्‍हाडींच्या साक्षीने केला.

वर्‍हाडी, स्नेहीजनांना आवाहन
नवविवाहीतांना ‘नेत्रदान संकल्प कार्ड’ ब्रह्मवृंद व वर्‍हाडांच्या साक्षीने सुपूर्द करण्यात आले. यावेळी नवविवाहीता प्रितेश व आसावरीने सर्व उपस्थित वर्‍हाडी मंडळी व स्नेहजनांना नेत्रदानाचे महत्व थोडक्यात सांगुन प्रत्येकाने हा संकल्प करावा अशी प्रेमाचा आग्रह त्यांनी केला. त्यांच्या या आवाहनाने मंडपात एकच टाळ्यांचा गडगडाट झाला. त्यांच्या या कार्याचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले. ठाकूर परिवाराच्या या अनोख्या उपक्रमाची चर्चा विवाहस्थळी चांगलीच रंगली होती. या निर्णयामुळे अनेकांच्या आयुष्यात रोशनी आल्यास आम्हाला आनंद होईल असे ठाकूर यांनी सांगितले.