भुसावळातील घटना ; मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये महिलावर्गात भीती
भुसावळ- शहरात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. जुन्या चोर्यांचा तपास थंडबस्त्यात असतानाच नव्याने होणार्या चोर्या महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. छत्तीसगड राज्यातील बिदालीची विवाहिता भुसावळात लग्नासाठी आल्यानंतर प्रभाकर हॉलजवळ दुचाकीवरून तोंडाला रूमाल बांधून आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेचे मंगळसूत्र लांबवल्याने वर्हाडींमध्ये मोठी खळबळ उडाली मात्र सुदैवाने महिलेने प्रसंगावधान राखत मंगळसूत्र धरल्याने अर्धे मंगळसूत्रच चोरट्यांच्या हाती लागल्याने चोरटे ते घेवून पसार झाले. महिलेने गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
निष्क्रीय पोलिसांमुळे वाढल्या चोर्या
गुरूवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास प्रमिला महाजन (रा. बिदाली, छत्तीसगड) या विवाह सोहळ्याला जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघा युवकांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढले मात्र महाजन यांनी प्रसंगावधान राखत मंगळसूत्र धरून ठेवल्याने अर्धेच मंगळसूत्र घेत चोरटे पसार झाले. शहर पोलिसांना याच माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी डीबी कर्मचार्यांना घटनास्थळी पाठवले मात्र संशयास्पद चोरटे आढळले नाहीत. ज्या परीसरात घटना घडली त्या परीसरातील सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. महिलेने तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.