भादली रेल्वे स्थानकावरील घटना ; पाहुणे मंडळींना गेला होता रेल्वे स्थानकावर घ्यायला
जळगाव- काही दिवसांपूर्वी लग्नासाठी मुलगी पसंत केली, मुलीच्या कुटुंबियांनाही त्यांनाही मुलाचे कुटूंब तसेच मुलगा सर्व पसंत होते. बस्ता तसेच साखरपुडा या कार्यक्रमांचे दोन्ही कुटुंबियांकडून नियोजन सुरु होते. मात्र त्यापूर्वीच अक्षय शामसुंदर मोरे वय 24 रा. नशीराबाद याचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भादली रेल्वे स्थानकावर घडली. पाहुणे मंडळींना घेण्यासाठी तो रेल्वेस्थानकावर गेला होता, त्यातच ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
काय घडली नेमकी दुर्देवी घटना
अक्षयच्या घरी बाहेरगावाहून रेल्वे काही पाहुणेमंडळी येणार होती. कुटुंबियांना सांगून अक्षय पाहुणे मंडळींना घेण्यासाठी शुक्रवारी पहाटे दुचाकी घेवून भादली रेल्वे स्थानकावर पोहचला. याठिकाणी स्थानकाबाहेर त्याने दुचाकी लावली. दुचाकी लावून स्थानकावर पोहचत असतांना, अचानक मार्गात असलेल्या रेल्वे रुळात त्याचा पाय अडकला, खूप प्रयत्न करुनही पाय निघाला नाही, यामुळे अक्षय रुळावर पडला, नेमकी याचवेळी लाईनवरुन नवजीवन सुपरफास्ट एक्स्प्रेस जात होता. या एक्स्प्रेसखाली येवून त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.
कपड्यांसह हातावर गोंधलेल्या नावामुळे पटली ओळख
अक्षयच्या कपडे तसेच त्याच्या हातावर गोंधलेल्या अक्षय नावामुळे ओळख पटली. स्थानकावर असलेल्या नशिराबादसह परिसरातील अक्षयच्या परिचयाच्या लोकांच्या माध्यमातून बातमी नशिराबाद येथे कुटुंबियांपर्यंत पोहचली. नातेवाईकांनी रेल्वे स्थानक गाठले व नशिराबाद पोलिसांच्या माध्यमातून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. घटनेची माहिती मिळताच नशिराबादमधील नागरिक, तरुणांसह नातेवाईकांनी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेवून नशिराबाद येथे हलविला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घरचा कर्ता पुरुष गेला
नशिराबाद येथे अक्षय हा आई सुरेखा, भाऊ सागर यांच्यासमवेत वास्तव्यास होतो. बहिणी चारुलता विवाहित आहे. अक्षयचे वडील शामसुंदर नामदेव मोरे यांचे अक्षय लहान असतांना निधन झाले आहे. वडीलांच्या निधनामुळे तसेच घरात मोठा असल्याने कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी अक्षयवर होती. त्यानुसार नशीराबाद येथील रेशन दुकानावर काम करुन तो उदरनिर्वाह भागवित होता. घरचा कर्ता पुरुष गेल्याने आईसह बहिणी तसेच भावाने प्रचंड आक्रोश केला होता.
महिनाभरापूर्वीच लग्नासाठी मुलगी केली पसंत
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयच्या लग्नासाठी मुलगी पाहणे सुरु होते. महिनाभरापूर्वी अक्षयसाठी एका मुलीचे स्थळ आले होते. मुलगी पसंत होती. दोन्ही कुटुंबियांमध्ये बोलणी होवून बस्ता, साखरपुडा अशा कार्यक्रमाचे नियोजन सुरु होते. यासाठी बाहेरगावचे पाऊणेमंडळी शुक्रवारी पहाटे रेल्वेने नशिराबाद येथे येत होते. त्यांनाच घेण्यासाठी अक्षय स्थानकावर गेला होता, मात्र रेल्वेखाली येवून त्याचा दुर्देवी मृत्य झाल्याची घटना घडली.