लग्न घटीका साधण्यासाठी पुढार्‍यांची होतेय दमछाक

0

कार्यकत्यांची मने जपण्यासाठी एकाच मुहुर्तावर अनेक लग्नांना हजेरी लावण्यासाठी पुढाच्यांची कसरत

चिंबळी (सुनील बटवाल) :- कधी व्होट बँक जपताना तर कधी कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांची मने जपण्यासाठी राजकीय नेत्यांना लग्न सोहळ्यांना हजेरी लावावी लागते. शुभ मुहुर्तावर एकाच दिवशी अनेक लग्नांचा बार उडत असल्याने लग्न घटीका साधण्यासाठी त्यांची अक्षरशः दमछाक होते. त्यातच यंदा मुहूर्त कमी असल्याने नेत्यांच्या पोटात गोळा आला असून सांगता ही येईना आणि सहनही होईना अशी त्यांची अवस्था झाली आहे.

लग्न सोहळ्यातून राजकीय वजन
तुळशी विवाह पार पडल्यानंतर लग्न सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा विवाहासाठी मोजकेच मुहुर्त आहेत. जानेवारी 2018 मध्ये शुक्र अस्तामुळे एकही मुहूर्त नाही. मार्चमध्ये सात, ऐन लग्नाचा हंगाम असलेल्या एप्रिलमध्ये आठ तर मे मध्ये दहा, जूनमध्ये चार आणि जुलैमध्ये सात मुहुर्त आहेत. परिणामी, एकाच दिवशी अनेक लग्नांचा बार उडणार आहे. मेगा इव्हेंट ठरत असलेल्या लग्न सोहळ्यांना नेते मंडळींची हजेरी जणू गरजेची झाली आहे. आपले राजकीय, सामाजिक वजन दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक लग्न सोहळ्यातून होत असतो. त्यामुळे राजकीय पुढार्‍यांची आवर्जून नावे लग्न पत्रिकेवर छापली जातात. एवढेच नव्हे तर त्यांना लग्नाला येण्यासाठी आग्रह धरला जातो. येथेच राजकीय मंडळींची अडचण होवून बसते.

कार्यकर्ते जपण्यासाठी हजेरी गरजेची
आपल्या घरच्या विवाह सोहळ्यात पुढार्‍यांनी हजर राहावे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आणि त्याला नकार देणे नेते मंडळींना अवघड असते. कोणत्या ना कोणत्या निवडणुका आणि पक्षांचे कार्यक्रम सारखे चालूच असतात. त्यासाठी कार्यकर्त्यांची गरज असते. जुन्या कार्यकर्त्यांबरोबरच नवे कार्यकर्तेही जोडायचे असतात. यावेळीही काही हक्काचे मतदार असतात; पण जे नसतात त्यांना चुचकारायचे असते. त्यामुळे इच्छा नसली तरी अनेक पुढार्‍यांना अशा सोहळ्यांचे औचित्य साधत कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जवळ करण्यासाठी तिथे जावेच लागते.

लग्न सोहळ्याबरोबरच आशिर्वादाची भाषणे
एकाच मुहूर्तावर आठ-दहा विवाह एकाच दिवशी आठ-दहा विवाह व विवाहाची वेळ ही थोड्याफार फरकाने तीच असल्याने ती साधताना राजकीय पुढार्‍यांची अक्षरशः कसरत होते. कुठे लग्नाचे मुहूर्त होऊन गेलेले असतात, तर कुठे वर्‍हाडच आलेले नसते. अशा परिस्थितीतही त्या सोहळ्यांना भेटी देत सोहळ्याच्या ठिकाणचे हार-तुरे, शाल-श्रीफळ असे सत्कार स्वीकारत पुढचा सोहळा गाठण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असते. लग्न सोहळ्यात सत्कार सोहळ्यांबरोबर आशीर्वादाची भाषणं करावी लागतात. त्यामुळे एका लग्नाला तासभराचा कालावधी जातो. तेथून पुन्हा धावपळ करुन दुसर्‍या लग्न सोहळ्यांना हजेरी लावण्यासाठी एनर्जी टिकवून ठेवावी लागते. मतदार राजा अथवा आपल्या कार्यकर्त्यांना दुखावणे शक्य नसते. अशा परिस्थितीत यंदा कमी मुहुर्तावर जास्त लग्नाचे बार उडणार असल्याने किती ठिकाणी हजेरी लावायची, असा प्रश्‍न राजकीय पुढार्‍यांना पडला आहे.