लघुचित्रपट महोत्सवांतून कलाकारांची फसवणूक!

0

पिंपरी-चिंचवड (शरणू जवळगी)। राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात लघुचित्रपट महोत्सवाची चळवळ सुरू आहे. सुरुवातील मुंबई, कोलकाता, दिल्ली, पुणे अशा विविध महानगरांमध्ये भरणारे लघुचित्रपट महोत्सव आज तालुकास्तरांपर्यंत येऊन पोहचले आहेत. ही बाब सर्वांसाठी अभिनंदनीय आहे. यामुळे कलाकरांना व्यासपीठ मिळत आहे. त्यातून नव-नवे कलाकर, दिग्दर्शक यांची निर्मिती होत आहे. परंतु या महोत्सवांच्या माध्यमातून काही ठिकाणी नवोदित कलाकारांची फसवणूक आणि गैरप्रकार सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.

काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट व्यवसायाला भरारी मिळेल की नाही, याबाबत शंका होती. परंतु मराठी चित्रपटांची आजची अवस्था पाहिल्यास नक्कीच आश्‍चर्य वाटेल. ‘सैराट’सारख्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व चित्रपटांचे विक्रम मोडीत काढत शंभर कोटींचा व्यवसाय केला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी नवख्या कलाकारांना सोबत घेऊन सैराट चित्रपटाची निर्मिती केली आणि चित्रपट सुपरहीट ठरला. यामुळे चित्रपटाविषयी चांगली आणि वादग्रस्त चर्चा ऐकायला मिळाली. यातला चांगला परिणाम असा झाली की, राज्यात मोठ्या प्रमाणात लघुचित्रपटांची निर्मिती होऊ लागली.

सोशल मीडियामुळे वाढले प्रस्थ
सुरुवातील शहरांमध्ये भरणारे लघुचित्रपट महोत्सव आता तालुक्यापर्यंत येऊन पोहचले आहे. सोशल मीडिया हे माध्यम त्यासाठी प्रमुख कारण आहे. काही वर्षांपूर्वी एखाद्या महोत्सवाचे आयोजन केल्यास त्याची जाहिरात वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओ, होर्डिंग्जच्या माध्यमातून करावी लागत होती. ही बाब प्रचंड खर्चिक स्वरुपाचे असल्यामुळे निवडक लघुचित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जायचे. परंतु आज जाहिरातीचा खर्च सोशल मीडियामुळे शून्यापर्यंत येऊन पोहचला आहे. लघुचित्रपट महोत्सवांच्या जाहिरासाठी आज व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून, त्याला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे.

अशी होते फसवणूक
लघुचित्रपट महोत्सवात भाग घेण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाकडून प्रवेश फी आकारण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या महोत्सवात पैशांची उलाढाल होते. तसेच महोत्सव घेण्यासाठी कोणाचीही परवानगी लागत नाही. त्यामुळे अनेक व्यक्ती या महोत्सवाचे आयोजन करून पैसे कमवत आहेत. प्रवेश फी मनमानी स्वरूपात स्वीकारणे (500, 1000 रूपये) तसेच लेट फी आकारणे (700, 1500 रूपये). ऐनवेळी महोत्सवाची तारीख पुढे ढकलणे किंवा महोत्सव रद्द करणे, महोत्सवासाठी आकारलेली फी अडवून धरणे, महोत्सवातील विजेत्या स्पर्धकांच्या पारितोषिक रकमेत सभारंभाच्या दिवशी ऐनवेळी निरर्थक कारणे देऊन रद्द करणे, नंतर देऊ, टप्प्याटप्याने देऊ असे सांगून मनधरणी करणे, महोत्सवाचा निकृष्ट दर्जा, ओळखीचा फायदा करून घेणे आदी प्रकार काही महोत्सवाच्या आड सुरू आहेत.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महा-मंडळाकडे तक्रार
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्याकडे योगसिंह ठाकूर , विष्णू मोरे (दिग्दर्शक) यांनी तक्रार केली आहे. महामंडळाने महोत्सवासाठी कठोर नियमावली तयार करावी. त्यामुळे कोणत्याही कलाकारांची फसवणूक होणार नाही. तसेच महोत्सव घेण्याआधी चित्रपट महामंडळाची परवानगी घेणे बंधनकारक करावे. त्यामुळे अशा महोत्सवांवर महामंडळाचा अंकुश राहिल, अशी मागणी ठाकूर आणि मोरे यांनी केली आहे.

लघुचित्रपट महोत्सवासाठी महामंडळाच्या नियमावलीत कोणतीच तरतूद नव्हती. परंतु महोत्सवाच्या माध्यमातून वाढत असलेल्या गैरप्रकारांवर अंकुश मिळवण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरातच अशा महोत्सवासाठी महामंडळाकडे परवानगी घेणे बंधनकारक राहील. त्याचबरोबर राज्यात होणार्‍या महोत्सवांवर महामंडळाचे लक्ष राहील. यामुळे कलाकारांची होणारी फसवणूक थांबण्यास मदत होईल.
– मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ