जळगाव: गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक सर्वसाधारण, स्थायी, जलव्यवस्थापन समितीच्या सभेत लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली जाते. अनेकवेळा त्यांच्या कार्यमुक्तीचा ठराव झाला आहे, मात्र सभेपुरता वेळ मारून नेण्यात येते. कोणतीही कारवाई होत नाही. दरम्यान बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी आर.के.नाईक यांच्यावर कारवाई केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. शेवटी प्रभारी सीईओ वान्मथी सी. यांनी सर्व प्रकरणांची माहिती घेऊन तातडीने आर.के.नाईक यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पुढील सभेला नाईक यांच्याविषयी प्रश्नच येणार नाही याची काळजी घेते असे आश्वासन प्रभारी सीईओ यांनी दिल्याने सभा झाली.
कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा
सभेच्या सुरुवातीलाच भाजपचे सदस्य रविंद्र पाटील यांनी आर.के.नाईक यांनी तब्बल २० कोटींच्या निधीचे परस्पर खर्च करण्याचे नियोजन केले. केंद्राच्या जलशक्ती योजनेवर जि.प.चा निधी खर्च केला. तसेच दोन वर्ष होऊनही बंधाऱ्यांची कामे केली नसल्याने आक्रमक होत कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांना कार्यमुक्त करण्यात यावी अशी मागणी केली. कारवाई केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका घेत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला. त्यामुळे सभागृहात बराच गोंधळ झाला. शेवटी यात प्रभारी सीईओ यांना हस्तक्षेप करून कारवाईचे आश्वासन द्यावे लागले. प्रभारी अतिरिक्त सीईओ विनोद गायकवाड यांनी नाईक यांना पाच दिवसाच्या मुदतीत कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश देण्यात असे सांगितले होते. मात्र प्रभारी सीईओ यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
उडवाउडवीचे उत्तर
सदस्यांच्या तक्रारीनंतर आर.के.नाईक यांना उत्तर देण्यासाठी समोर बोलविण्यात आले. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आल्याने सदस्य अधिकच आक्रमक झाले. जलशक्ती योजनेसाठी जि.प.च्या वळविलेला निधीचे नियोजन रद्द करून पुन्हा नव्याने नियोजन करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर नाईक यांनी सर्व कामे थांबविल्याचे सांगितले.