लघु पाटबंधारे तलावाच्या पाटचार्‍यांची झाली तुटफूट

0

बोदवड। तालुक्यातील लघु पाटबंधारे जलसंपदा विभागांतर्गत असलेले लघु पाटबंधारे तलावावरील झाडेझुडपे व पाटचार्‍यांमध्ये मोठमोठे गवत वाढलेले असून यात दगडगोटेसुध्दा पडलेले आहे. तसेच ठिकठिकाणी जलसेतु तुटलेले असून दगडी बांधकामास हानी पोहचलेली आहे. मात्र लघु पाटबंधारे तलावाच्या वाईट स्थितीकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष अधिकारीवर्गाकडून केले जात आहे. जलसंपदा विभागाच्या 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची व्यथा मांडून भाजपा सरकार सत्तेवर आले. मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बोदवड तालुक्यातील एकही लघु पाटबंधारे तलावाची इतर कामे सोडा विशेष दुरुस्तीअंतर्गत कोणत्याच तलावाचे काम केलेले नाही.

चार्‍यांमध्ये वाढली काटेरी झाडे, झुडपे
बोदवड तालुक्यात साळशिंगी, जुनोने दिगर, जलचक्र बु. या तीन लघु पाटबंधारे तलावाची कोणतीही कामे पाटबंधारे विभागामार्फत केलेली नाही. साळशिंगी, जुनोने, जलचक्र बु. या तिनही तलावाच्या पाटचार्‍याचे पाईप, जलसेतुचे भिंतींवरील वाढलेली झाडेझुडपे काढणे, चारीतील दगडगोटे, मुरुम व सुपर पॅसेजची कामे, अस्तरीकरणाचे कोपींगचे टी जोडची कामे, एचआरची कामे, विमोचकांची दगडी बांधकामे केलेली आढळून येत नाही. कोणतेही कामे न होता सिंचनाचा टक्का वाढेल. साळशिंगी, जुनोने व जलचक्र बु. तलावाच्या भिंतींवर काटेरी बाभळाची, कडुनिंबाची यासह रानटी झाडेझुडपे वाढलेली आहे. या ठिकाणी पाटांचे कोणतेही दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही. तरी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी याकडे लक्ष देवून तलावांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.