लघूशंकेवरून प्राणघातक हल्ला ; नावरेच्या चौघा आरोपींना तीन वर्ष शिक्षा

0

यावल न्यायालयाचा निकाल ; तक्रारदार कुटुंबाला 45 हजारांची भरपाई देण्याचे आदेश

यावल- तालुक्यातील नावरे येथे घराजवळील सार्वजनिक गल्लीत तक्रारदार लघूशंका करीत असल्याच्या कारणातून चौघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. 29 नोव्हेंबर 2015 रोजी ही घटना घडल्यानंतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात आरोप सिद्ध झाल्याने चौघा आरोपींना प्रथमवर्ग न्यायाधीश डी. जी. जगताप यांनी तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व चौघांना प्रत्येकी 12 हजारांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी फिर्यादीच्या वारसांना 45 हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले.

लघूशंकेवरून केली होती मारहाण
नावरे येथे 29 नोव्हेंबर 2015 रोजी फिर्यादी नितीन बापू पाटील (हल्ली मृत) हा त्याच्या घराजवळील सार्वजनिक बोळात लघूशंका करीत असल्याच्या कारणावरून आरोपी भानुदास मोतीराम पाटील (39), भावलाल भगवान पाटील (49), नीलेश भानुदास पाटील (19) व राकेश भावलाल पाटील (20) या चौघांनी शिविगाळ करत कुर्‍हाड, लोखंडी गज व लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल झाला. तपासी अंमलदार सहायक फौजदार पांडुरंग सपकाळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार सरकारी वकील नितीन खरे यांनी फिर्यादीची आई व इतर साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सुनावणीअंती चारही आरोपी दोषी आढळले. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार प्रमोद लोणे व केस वॉच हवालदार अलीम शेख यांनी काम पाहिले. न्यायालयाच्या निकालामुळे किरकोळ कारणाने वाद निर्माण करणार्‍यांवर वचक निर्माण होईल, असे पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांनी सांगितले.