लज्जतदार खाद्यपदार्थ पाहून तोंडाला सुटले पाणी!

0

पिंपरी-चिंचवड : खमंग ढोकळा, सुरळीच्या वड्या, तुपातले धिरडे, रगडा पॅटीस, रव्याच्या करंज्या, दही-कचोरी, गव्हाची खीर, दळाचे लाडू या खाद्यपदार्थ्यांचे नुसते नाव जरी घेतले; तरी तोंडाला पाणी सुटते. हे सारे लज्जतदार खाद्यपदार्थ ‘लेवाशक्ती सखी मंच’च्या सदस्या असलेल्या सुगरण सखींनी तयार केले होते. निमित्त होते; ‘लेवाशक्ती सखी मंच’च्या वतीने आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेचे. ही स्पर्धा सोमवारी दुपारी दीड ते तीन या वेळेत चिंचवड, शाहूनगर येथील गणराज माऊली बिल्डींगमध्ये वसुधा खर्चे यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला सखी मंचच्या महिला सदस्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी गव्हाचे पीठ आणि हरभरा डाळीच्या पिठापासून एकाहून एक सरस गोड आणि तिखट खाद्यपदार्थ तयार केले होते. हे खाद्यपदार्थ पाहून स्पर्धेसाठी उपस्थित सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले. प्रत्येकाला खाद्यपदार्थ चाखण्याचा मोह आवरता आला नाही.

15 महिलांचा स्पर्धेत सहभाग
महिलावर्गाच्या अंगी असलेल्या कला-गुणांना वाव मिळावा, त्यांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने लेवाशक्ती सखी मंचच्या वतीने महिलांसाठी नेहमी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने सोमवारी पाककला स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत लेवाशक्ती सखी मंचच्या 15 महिला सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी शुभांगी बेंडाळे यांनी सांभाळली. स्पर्धेच्या संयोजनासाठी लेवाशक्ती सखी मंचच्या गौरी सरोदे, रेखा भोळे, विभावरी इंगळे, चारुलता चौधरी, सुलभा धांडे, किरण पाचपांडे, रजनी बोंडे आदींनी पुढाकार घेतला.

खाद्यपदार्थ चाखण्याची पर्वणी
या पाककला स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला सदस्यांनी गव्हाचे पीठ तसेच हरभरा डाळीच्या पिठापासून खमंग ढोकळा, सुरळीच्या वड्या, तुपातले धिरडे, रगडा पॅटीस, रव्याच्या करंज्या, दही-कचोरी, गव्हाची खीर, दळाचे लाडू असे एकाहून एक खमंग व चविष्ट खाद्यपदार्थ साकारले होते. या पदार्थांचे परीक्षण झाल्यानंतर उपस्थितांना ते पदार्थ चाखण्याचा मोह आवरता आला नाही. गोड व तिखट असे खाद्यपदार्थ असल्याने स्पर्धेला उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांच्यावर मनसोक्त ताव मारला.

ठिकठिकाणी पाककला स्पर्धा
लेवाशक्ती सखी मंचच्या वतीने ठिकठिकाणी पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात 11 एप्रिल रोजी रहाटणी व पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, 12 एप्रिल रोजी शरदनगर, चिखली आणि 13 एप्रिल रोजी चिंचवड, बिजलीनगर येथे या स्पर्धा पार पडणार आहेत. या सार्‍या स्पर्धांचे निकाल लेवाशक्ती सखी मंचच्या वतीने 15 एप्रिल रोजी दैनिक ‘जनशक्ति’च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंचच्या वतीने रेखा भोळे यांनी दिली.