मुंबई । जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून जगप्रसिद्ध इजिप्तची रहिवासी असलेली 36 वर्षीय इमान अहमद ही मुंबईसाठीही बरीच परिचित होती, अवघ्या जगात उपचारासाठी नकारघंटा मिळत असताना मुंबईतील सैफी रुग्णालयाने इमानवर उपचार करण्याची तयारी दर्शवली आली. एका रात्रीत सैफी रुग्णालयही जागतिक प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यावर उपचारही सुरू झाले, इमानच्या अनेक शस्त्रक्रिया करून तिचे वजनही घटवण्यात आले. मात्र, तिच्या बहिणीने रुग्णालय प्रशासनावर आरोप केले आणि रुग्णालय प्रशासनाचा गोंधळ उडाला. अखेरीस तिच्या बहिणीच्या आग्रहाने इमानला उपचारासाठी अबूधाबी येथे पाठवण्यात आले. तेथे मात्र तिचा दुर्दैवी अंत झाला.
सैफी रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तिचे वजन 500 किलोवरून 238 किलोपर्यंत कमी झाल्याची माहिती होती. वजनामुळे गेल्या 25 वर्षांत घरातून एकदाही बाहेर पडली नव्हती. स्थानिक वेळेनुसार सोमवारी 25 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. वजन कमी करण्याच्या उपचारांदरम्यान किडनी फेल आणि आतड्याला सूज आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले.
इमानसाठी होती विशेष सुविधा
जवळपास 20 डॉक्टरांची टीम तिच्यावर देखरेख ठेवून होती. सैफी रुग्णालयात प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला इमानवर वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करत होते. शस्त्रक्रियेसाठी वन बेड हॉस्पिटल ही संकल्पना वापरण्यात आली होती. इमानच्या शस्त्रक्रियेसाठी 3 हजार स्क्वेअर फुटांची विशेष खोली बनवण्यात आली होती. सैफी रुग्णालयात इमानची प्रकृती खालावल्याचा दावा तिची बहीण सायमाने केला होता. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासन आणि सायमामध्ये वाद झाले. अखेर इमानला अबुधाबीला हलवण्याचा निर्णय झाला. मात्र, जाण्यापूर्वी सायमाने आपला गैरसमज झाल्याची कबुलीही दिली.
इमान अहमदचे ते 82 दिवस
1 11 फेब्रुवारीला, इजिप्तएअरच्या कार्गो विमानाने इजिप्तची 36 वर्षीय इमान अहमद मुंबईत पोहोचली. इमानचे वजन, तब्बल 500 किलो होते. इमानला मुंबईत आणण्यासाठी विमानात एक खास बेड बनवण्यात आला होता. इमान मुंबईत तर पोहोचली. पण, तिच्या वजनामुळे तिला सैफी रुग्णालयात नेणे शक्य नव्हते. यासाठी तिचा बेड एका क्रेनच्या माध्यमातून उचलण्यात आले आणि इमानला पहिल्या मजल्यावरील तिच्यासाठी खास बनवण्यात आलेल्या रुममध्ये ठेवण्यात आले. इमानला तिच्यासाठी खास बनवलेल्या रूममध्ये ठेवण्यात आले.
2 सैफी रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी यांनी इमानवर उपचार करण्यास सुरुवात केली. वजन कमी करण्यासाठी इमानवर 7 मार्च 2017ला यशस्वी बेरिअट्रिक सर्जरी करण्यात आली. सैफी रुग्णालयाचे बेरिअट्रिक सर्जन डॉ. मुफज्जल लाकडावाला आणि त्यांच्या टीमने इमानवर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर इमान डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली होती. इमानला हाय प्रोटीन डाएट (आहार) देण्यात येत होते.
3 मुंबईतील डॉक्टरांच्या उपचारांमुळे इमानचे वजन 170 किलोपर्यंत कमी झाले. इमान भारतात आली तेव्हा तिचे वजन तब्बल 500 किलो होते. भारतातून जाताना सैफीच्या डॉक्टरांनी 28 पानांचा डिस्चार्ज रिपोर्ट बुर्जीलच्या डॉक्टरांना दिला होता. ज्यात अजून एक बेरियाट्रीक सर्जरी धोक्याची असल्याची माहिती देण्यात आली होती. इमानचं वजन कमी झाल्यानंतर तिला सैफी रुग्णालयातील 701 क्रमांकाच्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. 6 नर्सची टीम तिची देखरेख करत होती. रुग्णालयातील नर्सच्या म्हणण्याप्रमाणे, इमानला अबूधाबीला जायचं नव्हतं. पण, बहिणीने अबूधाबीला जाण्याचा निर्णय घेतला.
4 इमानची बहीण शायमाने सोशल मीडियावर इमानचा एक व्हिडिओ अपलोड करून सैफीच्या डॉक्टरांवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला, तर डॉ. लकडावाला यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. शायमाचे सर्व आरोप डॉ. लकडावाला आणि त्यांच्या टीमने फेटाळून लावले. शायमाच्या आरोपांनंतर अबूधाबीच्या बुर्जील रुग्णालयाने इमानवर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला. बुर्जीलच्या डॉक्टरांची टीम मुंबईत आली. त्यांनी इमानची प्रकृती पाहिली आणि मुंबईतील डॉक्टरांशी चर्चा केली. 4 मे 2017ला इमान 82 दिवस मुंबईत राहिल्यानंतर अबूधाबीला रवाना झाली. इजिप्तएअरच्या कार्गो विमानाने इमानला अबूधाबीला नेण्यात आले.
असे झाले आरोप-प्रत्यारोप
मुंबईतील सैफी रुग्णालयात इमान अहमद वजन कमी करण्यासाठी उपचार घेत होती. डॉ. मुझफ्फल लकडावाला यांच्याकडे ती उपचार घेत होती. डॉक्टर तिची व्यवस्थित काळजी घेत होते, तिचे वजन कमी होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, सैफीतील उपचाराने इमानने आयुष्य उद्ध्वस्त झाले, डॉक्टर आमच्याशी खोटे बोलले, असा आरोप इमानच्या बहिणीने केला होता. इमानला रुग्णालयात 11 फेब्रुवारी रोजी दाखल केले होते. मात्र, रुग्णालयाने तिला दाखल करुन घेताना तिचे वजनही करून घेतले नाही आणि केले असेल तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान शायमा यांनी दिले होते. दरम्यान, डॉ. लकडावाला यांनी इमानच्या बहिणीचे सर्व आरोप फेटाळले होते. इमानवर उपचार करुन तिला पुन्हा तिच्या घरी पाठवण्याचे नियोजन करत असल्याने शायमाने आरोप केले आहेत, असा प्रत्याराोप डॉ. लकडावाला यांनी केला होता.