मार्शल भारताची तीन सैन्य दले ही भारताची खर्या अर्थाने ताकद बनली आहे. सर्व दिशेने आकाश-पाताळ देशाला सुरक्षिततेच्या कड्यामध्ये ठेवण्यात या तीनही दलांची मोलाची कामगिरी आहे. त्यामुळे ही सेनादले सामान्यांसाठी आकर्षणबिंदू बनले आहेत. भारत-पाकिस्तानदरम्यान अनेकवेळा युद्ध घडले, युद्धाचे प्रसंगही घडले, त्या त्यावेळी सैन्य दलांनी उत्तम कामगिरी केली. युद्धातील सैन्याच्या शौर्याच्या कथा ऐकून आपली मान नेहमीच उंचावत असते. पाकिस्तान आणि चीन यांसारखे शत्रू राष्ट्रे भारताच्या विरुद्ध शस्त्रे परजून बसली असतानाही अवघे भारतवासीय निश्चिंतपणे त्यांचे नित्य व्यवहार चालू ठेवू शकतात, याला सक्षम आणि कणखर सेनादले, हे एकमेव कारण आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. असीम त्याग, प्रखर राष्ट्रप्रेम आणि मृत्यूचेही भय न बाळगणार्या कणखर मनाच्या सैनिकांमुळेच एखादे राष्ट्र सुरक्षित आणि भयमुक्त राहू शकते. भारतीय वायुदलाला अत्यंत विश्वासार्ह आणि कर्तृत्ववान घडवणारे मार्शल अर्जनसिंह यांच्या सारख्या अधिकार्यांमुळेच ही सैन्य दले सक्षम बनली आहेत.
देशाच्या रक्षणाचा ध्यास घेऊन त्यांनी वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी वायुदलात प्रवेश केला. तेव्हापासून आतापर्यंत सतत चढता राहिलेला त्यांच्या कारकिर्दीचा आलेख देशासाठी अभिमानास्पद आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात दुसर्या महायुद्धातील अतुलनीय कामगिरीसाठी सैन्याच्या आग्नेय आशियाच्या प्रमुखांकडून डिस्टिंग्विशड फ्लाइंग क्रॉस हे प्रतिष्ठेचे शौर्यपदक मिळवणारे ते पहिले भारतीय वैमानिक आहेत. पाच स्टार मिळवणारे तसेच मार्शल हे सर्वोच्च पद प्राप्त करणारे वायुदलाचे एकमेव कर्तृत्ववान अधिकारी अर्जनसिंह हे भारताचे खरे नायक आहेत. 1965 च्या भारत-पाक युद्धात असामान्य शौर्याच्या बळावर त्यांनी पाकिस्तानला जेरीस आणले होते. त्या वेळी अखनूर शहरात पाकिस्तानकडून हल्ला झाल्यावर संरक्षण मंत्रालयाने आपले वायूदल प्रतिआक्रमणासाठी किती वेळात तयार होईल, असे विचारल्यानंतर अर्जनसिंह यांनी अत्यंत आत्मविश्वासाने उत्तर दिले की, एका तासात! खरोखरंच त्यांच्या या वक्तव्यानंतर बरोबर एका तासानंतर भारतीय लढाऊ विमाने पाकिस्तानचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पोहोचलीही होती. वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी मिळालेले भारतीय वायुदलाचे दायित्व त्यांनी इतक्या कार्यक्षमपणे पार पाडले होते. भारतीय वायुदलाला त्यांनी सशक्त आणि कार्यक्षम तर बनवलेच, शिवाय विश्वातील चौथे सर्वांत मोठे वायुदल असलेला देश म्हणून भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला. सेवेतील कर्तव्यांसमवेत राष्ट्रीय समस्यांविषयीही संवेदनशील असलेले अर्जनसिंह यांनी निवृत्तीनंतर पंजाबमध्ये हिंदू आणि शीख यांच्यात निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी घरोघरी जाऊन प्रयत्न केले होते.
अर्जनसिंह यांच्यासारखे हिरे लाभलेली सेनादले सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहेत. त्या हिर्यांचा उपयोग राष्ट्राच्या उत्थानासाठी करणे, ही खरी कसोटी असते. आपल्या देशाला अत्यंत प्रगल्भ आणि बुद्धिमान मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लाभले आहे. सेनादले असोत, वैज्ञानिक संशोधन असो की शिक्षणक्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात अर्जनसिंह यांच्यासारखे राष्ट्रप्रेमी, हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व भारताला लाभले आहे. अनेक तडफदार प्रशासकीय अधिकारी, सेनाधिकारी भारतात आजही कार्यरत आहेत. काही जणांना त्यांचे कौशल्य आणि क्षमता पूर्णपणे वापरून देशसेवेसाठी झोकून देता येते. मात्र, काहींना मर्यादा येतात. गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार होणारे लढाऊ विमानांचे अपघात, शस्त्रखरेदीत होणारा भ्रष्टाचार हे सारे वातावरण एखाद्या राष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. वास्तविक भारतातील सेनादले, त्यांचे कर्तृत्ववान अधिकारी हेच भारताचे खरे नायक आहेत. देशसेवेसाठी त्यांची क्षमता पूर्णपणे वापरण्यासाठी पुरक वातावरण निर्माण करणे, हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. स्वदेशात निर्मिलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन यांमुळे आपली सेनादले आणखी बळकट होणार आहेत. शत्रूविरुद्धचा सूडाग्नी धगधगत असताना पाकिस्तान-चीनच्या हद्दीत घुसून शत्रूची होता होईल तेवढी हानी करण्याची ज्यांच्यात धमक आहे, त्यांच्या हातांना तत्पर निर्णयांनी बळकटी देण्यासाठी शासनव्यवस्थाही तशीच असणे आवश्यक आहे. ज्या देशाची सेनादले शूरवीर असतात आणि राज्यकर्ते मुत्सद्दी असतात, तेच देश महासत्ता होतात, हा आजवरचा इतिहास आहे. महासत्ता होण्यासाठीची पहिली आवश्यकता म्हणजे विजिगीषू सेनादले आपल्याकडे आहेतच, मुत्सद्दी शासनकर्त्यांची प्रतीक्षा आहे. वारंवार कुरघोड्या करणारा पाकिस्तान, चीन यांना धडा शिकवण्यासमवेतच पाकव्याप्त काश्मीर आणि चीनने बळकावलेली भारताची भूमी, हेही शौर्याच्या बळावर मिळवून विद्यमान सैनिकांना त्यांचे शौर्य गाजवण्याची संधी शासनाने द्यावी.
भारतीय सेनादलांनी यापूर्वी गाजवलेल्या शौर्याच्या कथा प्रेरणादायी आहेतच. मात्र, भारतीयांना आता वर्तमानही प्रेरणादायी झालेले पाहायचे आहे. भारतीय संरक्षण व्यवस्थेला असे अत्यंत विश्वासार्ह आणि उज्ज्वल भवितव्य देणारे अर्जनसिंह यांना देशाची तीच खरी श्रद्धांजली ठरेल, आत वायुदलात 32 स्वाड्रन लढाऊ विमानांची गरज आहे. महिलांना लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे वाहून नेणार्या विमानांची गरज आहे. वायुदलातील कमरता दूर करून वायुदल अधिकाधिक सक्षम बनवणे, हीच अर्जनसिंह यांना हीच सलामी ठरणार आहे.