जळगाव । महानगरपालिकेत खाविआला सत्ता स्थापनेसाठी मनसेनी पाठींबा दिल्याने पाच वर्षात एकदा तरी मनसेला महापौर पदाची संधी देण्यात येईल असे आश्वासन माजी आमदार सुरेश जैन यांनी दिले होते. त्याअनुषंगाने विद्यमान महापालिकेचे शेवटचे दहा महिने बाकी असतांना मनेसेचे ललित कोल्हे यांनी माजी आमदार सुरेश जैन यांची भेट घेतली त्यानंतर जैन यांनी महापौर नितीन लढ्ढा यांचा राजीनामा द्यायला लावला. खाविआ, मनसे, राष्ट्रवादी यांनी महापौर पदासाठी ललित कोल्हे यांना पाठींबा जाहीर केल्याने संख्याबळानुसार कोल्हे हे महापौर होणार हे निश्चित आहे. दरम्यान भाजपाने देखील महापौर पदासाठी अर्ज घेतले आहे. भाजपने अर्ज दाखल करु नये व खाविआ, मनसेला पाठींबा द्यावा अशा मागणीचा प्रस्ताव घेऊन खाविआ व मनसे पदाधिकार्यांनी भाजप महानगराध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी भेट घेतली. मनसेने भाजपला स्थायी समिती सभापतीपदासाठी मदत केल्याचे लक्षात घेऊन भाजप देखील मनसेचा महापौर व्हावा यासाठी सकारात्मक असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.
खाविआ, मनसेचा प्रस्ताव
7 रोजी महापौराची निवड होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी आज मंगळवार 6 शेवटची मुदत आहे. महापौरपदासाठी भाजपाने नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांच्यासाठी अर्ज घेतला आहे. तर अपक्ष नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी देखील अर्ज घेतला आहे. त्यामुळे महापौर निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी खाविआ, मनसे आग्रही असून महापौर पदाचे उमेदवार ललित कोल्हे, माजी उपमहापौर सुनिल महाजन, नगरसेवक श्याम सोनवणे, नितीन बरडे आदींनी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल आदींची भेट घेऊन बिनविरोधचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला आ.भोळे यांनी अनुकूलता दर्शवली आहे.
विकासाच्या मुद्यावर पाठींबा
विद्यमान महानगरपालिकेचे शेवटचे दहा महिने शिल्लक राहिले आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राजकारणापेक्षा विकासकामांची आवश्यकता आहे. सर्व नगरसेवकांना समान न्याय देऊन समान निधी वाटप व्हावे या अटीवर एका अटीवर भाजप बिनविरोधसाठी सकारात्मक आहे. तसेच विकासाचा मुद्दा डोळ्या समोर ठेवून भाजप मनसेचा महापौर व्हावा यासाठी पाठींबा देण्यास सकारात्मक असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.
मनेसेने भाजपला महानगरपालिकेत स्थायी समिती सभापतीपद मिळावे यासाठी पाठींबा दिला आहे. त्याअनुषंगाने भाजपदेखील मनसेचा महापौर व्हावा यासाठी पाठींबा देण्यास सकारात्मक आहे. आमचा पाठींबा मनसेला आहे खाविआला नाही.
– सुरेश भोळे, महानगराध्यक्ष तथा आमदार
माजी आमदार सुरेश जैन यांच्या आदेशानुसार बिनविरोधचा प्रस्ताव घेऊन भाजपाकडे गेलो. जळगावकरांच्या विकासासाठी राजकारण दुर ठेवून भाजपने बिनविरोधसाठी होणार्या महापौरपदाच्या निवडणुकीत सहकार्य करावे.
-ललित कोल्हे, प्रभारी महापौर