लंडन । बीसीसीआयला कोट्यावधी रुपयांची माया जमवून देण्यासाठी आयपीएलला जन्म देणारे, वादग्रस्त कार्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेले आणि अनेक आरोपांमुळे परदेशात वास्तव्यास असलेले ललित मोदी यांनी राजस्थान क्रिकेटचे हित लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट प्रशासनाला अलविदा केला आहे. ज्या नागौर जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते ते पद त्यांनी सोडले आहे. राजीनाम्याचे तब्बल तीन पानांचे पत्र त्यांनी बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष राहुल जोहरी यांना पाठवले.
राजस्थान क्रिकेटला पुन्हा चांगले दिवस यावेत, असे त्यांनी म्हटले आहे. हे तीन पानी पत्र ललित मोदी यांनी ट्विटवर पोस्ट केले आहे. बीसीसीआयने त्यांच्यावर बंदी घातली होती. मोदी दूर गेल्यामुळे राजस्थान क्रिकेटवरील बंदी रद्द होईल, तसेच या ठिकाणी पुन्हा आंतरराष्ट्रीय सामने होण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच बीसीसीआयकडून मिळणारा 100 कोटींचा वाटाही आता राजस्थान क्रिकेटला पुन्हा मिळू शकेल. दोन वर्षांच्या बंदीनंतर यंदापासून राजस्थान रॉयल्स हा संघ पुन्हा आयपीएलमध्ये येणार आहे.