धुळे । येे त्या 31 जुलै रोजी लळींग परिसरातील लांडोर बंगला येथे होणार्या भीमस्मृती यात्रेच्या नियोजनाबाबत पोलिस प्रशासन व सर्व दलित संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदींची व्यापक संयुक्त बैठक मोहाडी पोलिस स्टेशन येथे झाली. बैठकीला पोलिस विभागातर्फे अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमतराव जाधव, मोहाडी पोलिस स्टेशनचे सहा. पो. निरीक्षक जयंत शिरसाठ, पो. उपनिरिक्षक स्वप्नील राजपूत यांच्यासह एम. जी. धिवरे, वाल्मीक दामोदर, संजय पगारे, शशिकांत वाघ, सिद्धार्थ बोरसे, राज चव्हाण, किरण जोंधळे, आनंदराव बागूल, सुरेश लोंढे, प्रा. अनिल दामोदर, देवा केदार, प्रमोद सोनवणे, विशाल पगारे आदी विविध पक्ष-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा
त्यानुसार सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या आवाहनाला आम्ही योग्य तो प्रतिसाद देणार असून, याबाबत समाज व संघटनांतर्फे स्वतंत्र प्रेस नोट काढून सर्वांना आवाहन करणार असल्याची माहिती दिली. तसेच यात्रेत जास्तीत- जास्त स्वयंसेवक तैनात करुन ते नियोजनात पोलिस प्रशासनास सहकार्य करतील, असे आश्वासन दिले. बैठकीत पोलिस प्रशासन व सर्व उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये यात्रेत येणार्या विविध अडचणी व त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अप्पर पोलिस अधीक्षक पानसरे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जास्तीत-जास्त पोलिस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्यात येईल, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले असून भीमस्मृती यात्रा उत्साहाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
शांतता, शिस्त आबाधीत ठेवा
सालाबादाप्रमाणे यंदाही भीमस्मृती यात्रा आनंदात व उत्साहात संपन्न व्हावी, सार्वजनिक शांतता व शिस्त अबाधित रहावी, यासाठी काय नियोजन असावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या यात्रेनिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी येणार्या सर्व भाविक व भीमसैनिकांनी आपली चारचाकी वाहने परिसरात ट्रॉफीक जॅम होऊ नये व सर्वांना व्यवस्थीत बंगल्यापर्यंत जाता यावे, यासाठी मुख्य प्रवेशद्वाराच्या खालीच सर्व मोठी वाहने पार्किंग करावी, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी केले आहे.