मुंबई: बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती हॉलिवूड किंवा दाक्षिणात्य चित्रपटांच्या कथानकावर आधारित असतात. असाच एक नवा चित्रपट येणार असून हा चित्रपट एका हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक असल्याचं सांगण्यात येत आहे.
हॉलिवूड अभिनेत्री उमा थुर्मन हिची प्रमुख भूमिका असलेला हॉलिवूडपट ‘किल बिल’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने केवळ हॉलिवूड नाही तर संपूर्ण जगभराला वेड लावलं होतं. दोन भागांमध्ये विभागल्या गेलेल्या ‘किल बिल’ या चित्रपटाच्या सीरिजचा लवकरच हिंदी रिमेक येणार असून या चित्रपटाचे अधिकार निखिल द्विवेदी यांच्या प्रोडक्शन हाऊसला मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.
‘किल बिल’ हा चित्रपट एका लढवैय्या महिलेवर आधारित असून या महिलेची भूमिका उमा थुर्मनने वठविली आहे. आपल्या अधिकारासाठी लढणारी महिला थेट जपानमध्ये जाऊन पोहोचते आणि अधिकारांची लढाई जिंकते असं या चित्रपटाचं कथानक आहे. त्यामुळे हॉलिवूडचा हा चित्रपट लवकरच बॉलिवूड प्रेक्षकांनाही पाहता येणार आहे