180 कोटींचे बजेट, सरसंघचालक मोहन भागवत यांची मान्यता
नवी दिल्ली : गेली 93 वर्ष भारताच्या राजकारण आणि समाजकारणावर प्रभाव पाडणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अर्थात आरएसएसवर लवकरच चित्रपट येत आहे. 180 कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमाला आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
विचारधारा, ओळख आणि त्याग
या सिनेमासाठी 27 लोकांच्या टीमने 7 महिने संशोधन केले. त्यानंतर या संशोधनाच्या आधारे विजेंद्र प्रसाद यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली, असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरसंघचालकांना ही स्क्रिप्ट दाखविण्यात आली आहे. स्क्रिप्ट वाचून ते खूप खूश झाले. तथ्य आणि सत्यघटनांवर हा सिनेमा आधारीत असेल. सिनेमासाठी 180 कोटी रुपयांचा बजेट आहे. या सिनेमातून संघाची विचारधारा, संघाची खरी ओळख, भारतासाठी दिलेले बलिदान, त्याग दाखविण्यात येणार आहे.
एस. राजमौली यांचा पुढाकार
कन्नड सिने ऑडियो टायकून लहरी वेलू यांना संघावर सिनेमा बनविण्याची कल्पना सुचली होती. लहरी वेलू यांच्या ऑडिओ कंपनीकडेच बाहुबली आणि बाहुबली टू चे ऑडिओ राइट्स आहेत. बाहुबली प्रचंड हिट झाल्यानंतर संघावरही सिनेमा बनला पाहिजे, हा सिनेमाही हिट होईल, असे वाटल्याचे लहरी वेलू म्हणाले. संघावर सिनेमा बनविण्याची कल्पना बाहुबली फेम एस. राजमौली यांचे वडील विजेंद्र प्रसाद यांना सांगितली. त्यांना ही कल्पना आवडली. त्यानंतर सरसंघचालकांना भेटून त्यांच्यासमोर ही कल्पना मांडली, त्यांनी परवानगी दिल्यानंतर कामाला सुरुवात केली.