लवकरच सामान्य नागरिकांना बसणार रिक्षा भाडेवाढीचा फटका

0

लोकोपयोगी वाहतूकसेवा महागणार; हकीम समितीच्या शिफारशींनुसार रिक्षांच्या भाडेदरात होणार वाढ

नवी मुंबई । अच्छे दिनाची वाट पाहात सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचे चटके सहन करणार्‍या गोरगरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांना लवकरच रिक्षा दरवाढीचा चटका बसणार आहे. हकीम समितीच्या शिफारशींनुसार रिक्षांच्या भाडेदरात वाढ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकीकडे राज्य शासनाने रिक्षा परवाना धोरण मुक्त करून रिक्षांच्या गर्दीत वाढ केली आहे, तर दुसरीकडे दळणवळण सेवेतील एक महत्त्वाची लोकोपयोगी वाहतूकसेवा सर्वसामान्यांसाठी महागडी करण्याचे धोरण सुरू केले आहे. हा व्यवसाय प्रवासीसेवा म्हणून न करता गैरमार्गाने किंवा चुकीच्या पद्धतीने मोठ्या कमाईचा धंदा असा समज रिक्षाचालकांमध्ये होत चालल्याचे प्रवासी सांगत आहेत.

मीटरप्रमाणे न जाता क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्याचे प्रकार
प्रवाशांना मदत करण्याऐवजी त्यांना कसे लुबाडत येईल याकडे काही रिक्षाचालकांचा कल जास्त असतो. मीटरमध्ये फेरफार, जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धटपणे वागणे, मीटरप्रमाणे न जाता शेअर पद्धतीने क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसवणे आदी प्रकार सर्रासपणे नवी मुंबईत पाहायला मिळतात. उपप्रादेशिक कार्यालय, वाहतूक विभाग अश्या बेशिस्त, मुजोर रिक्षाचालकांवर अधूनमधून कारवाई करीत असतात. परंतु, राजकीय संघटनांचे आशीर्वाद प्राप्त असल्याने काही रिक्षाचालकांची शहरात दादागिरी चालू आहे. सध्या रिक्षा मीटरभाडे 18 रुपये आहे. हकीम समितीने रिक्षा दरवाढ सुचवली होती. शासनाने हकीम समिती बरखास्त केली व त्याजागी माजी सनदी अधिकारी खटावू यांच्याकडे रिक्षा दरवाढीचे अधिकार दिले आहेत.

दरवाढीबाबत अद्याप परिपत्रक नाही
या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार खटावू समितीने 3 रुपयांची दरवाढ करणारा अहवाल शासनाला सादर केला आहे. 30 ऑगस्टला याबाबत निर्णय जाहीर होणार होता. पण झाला नाही. अशी माहिती रिक्षा महासंघाचे अध्यक्ष कासम मुलाणी यांनी सांगितले, तर याबाबत नवीमुंबई उपप्रादेशिक अधिकारी संजय डोळे यांनी रिक्षा दरवाढीबाबत अद्याप कोणतेही शासकीय परिपत्रक, सूचना किंवा आदेश परिवहन विभागाकडून आले नसल्याचे सांगितले. वर्षाअखेरपर्यंत रिक्षा भाववाढीचा फटका नवी मुंबईकरांना बसणार अशी तूर्तास शक्यता आहे.