नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलन तुटवडा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला 200 रुपयांच्या नोटांची छपाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या नव्या नोटांचे डिझाईन व सुरक्षा फिचर्स याबाबत मात्र अधिकारी सूत्राने काहीच माहिती दिली नाही. तथापि, सुरक्षा फिचर्स अनोखे असतील, असे अधिकारी सूत्र म्हणाले. अर्थ मंत्रालयाशी झालेल्या आरबीआय अधिकार्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. सद्या या नोटांबाबत सरकारी प्रिटिंग प्रेसमध्ये विविध पातळीवर काम सुरु आहे.
चलन तुटवडा कमी करणार
8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक 1000 व 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यामुळे देशातील 85 टक्के चलन एका झटक्यात संपुष्टात आले होते. करचोरी पकडणे, काळा पैसा बाहेर आणणे, आणि बनावट नोटा रोखणे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर 2000 व 500 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. तरीही देशभर सद्या चलन तुटवडा जाणवत आहे. तो कमी करण्यासाठी 200 रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. 200 रुपयांच्या नोटांमुळे चलन व्यवहार सुलभ होईल, अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सद्या सरकारी प्रेसमध्ये या नोटा छापण्यास सुरुवात झालेली आहे.