लवकरात लवकर फेरनिवडणूक घ्या-प्रफुल्ल पटेल

0

भंडारा-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मतदान यंत्रासोबत छेडछाड झाली असून येथे पुन्हा लवकरात लवकर फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. या मतदारसंघात अनेक केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या, या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही मागणी केली आहे. या पोटनिवडणुकीत सकाळपासून ६ विधानसभा क्षेत्रातील ६४ केंद्रांवर मतदान थांबले होते. दरम्यान, ३४ ठिकाणी मतदान रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून आम्हाला सांगण्यात आले असल्याचे पटेल यांनी सांगितले.

निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जास्त उन्हामुळे इव्हीएमचे सेन्सर्स बंद पडले आहेत. मात्र, आत्ता सुरु असलेले मशिनही जर असेच बंद पडले आणखी कठीण परिस्थिती निर्माण होईल. मात्र, त्यानंतर मतमोजणीच्यावेळी बंद पडलेल्या सर्वच व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी व्हावी.

बऱ्याच युरोपिअन देशांमध्ये तेथिल निवडणूक आयोगाने आधुनिक तंत्रज्ञान म्हणून इव्हीएमचा वापर सुरु केला. मात्र, यातील तृटी समोर आल्यानंतर त्यांनी याचा वापर बंद करुन पुन्हा मतपत्रिकांचा वापर सुरु केला. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा आपल्याला फोन आला होता. यात त्यांनी कैरानात ३०० इव्हीएम काम करीत नसल्याचे आपल्याला सांगितल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले.

सध्याची मतदान प्रक्रिया ज्या पद्धतीने सुरु आहे ती रद्द करण्यात यावी. या इव्हीएमवर आम्हाला भरवसा नाही. कारण, या इव्हीएम मशिन्स सुरतवरून आणल्याने त्या व्यवस्थित आहेत की नाही याबाबत आम्हाला शंका आहे, असेही पटेल यावेळी म्हणाले.